सोलापूर (प्रतिनिधी) : संपूर्ण जिल्ह्याचे आणि सहकार क्षेत्राचे लक्ष लागलेल्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. आठ उमेदवार बिनविरोध निवडून आले असून, राज्याचे माजी सहकार मंत्री आमदार सुभाष देशमुख, पंढरपूर-मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे आणि माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे राजकीय चित्र आता अधिक स्पष्ट झाले आहे.
या निवडणुकीत उत्तर सोलापूर तालुका सोसायटी मतदारसंघातून पृथ्वीराज माने, दक्षिण सोलापूर तालुका सोसायटी मतदारसंघातून श्रीदीप हसापुरे, करमाळा सोसायटी मतदारसंघातून शंभूराज जगताप, माढा सोसायटी मतदारसंघातून यशवंत शिंदे आणि इतर मागास प्रवर्ग मतदारसंघातून अजिंक्यराणा पाटील बिनविरोध झाले आहेत. यापूर्वीच मोहोळ सोसायटी मतदारसंघातून बाळराजे पाटील, बार्शीतून आमदार राजेंद्र राऊत आणि मंगळवेढ्यातून सिद्धेश्वर आवताडे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली होती.
पृथ्वीराज माने यांची शेवटच्या क्षणी बाजी!
उत्तर सोलापूर तालुका सोसायटी मतदारसंघाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. या मतदारसंघातील लढत अखेरच्या क्षणापर्यंत रंगतदार राहिली. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत संपण्यास अवघे काही क्षण शिल्लक असताना दुपारी तीन वाजता बाबासाहेब पाटील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात पोहोचले आणि त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे पृथ्वीराज माने यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. शेवटच्या क्षणी झालेल्या या घडामोडीची राजकीय वर्तुळात विशेष चर्चा रंगली.
तीन आमदारांची माघार चर्चेचा विषय
या निवडणुकीतील सर्वात महत्त्वाची घडामोड म्हणजे तीन आमदारांनी घेतलेली माघार. माजी सहकार मंत्री आमदार सुभाष देशमुख, आमदार समाधान आवताडे आणि आमदार अभिजित पाटील यांनी कृषी व पणन मतदारसंघातून आपली उमेदवारी मागे घेतली. तीन आमदारांच्या माघारीमुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले आहे.
अजिंक्यराणा पाटील दिवसभर जिल्हा उपनिबंधक कार्यालयात
इतर मागास प्रवर्ग मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलेले अजिंक्यराणा पाटील दिवसभर जिल्हा उपनिबंधक कार्यालयात उपस्थित होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी येणाऱ्या प्रत्येकाची ते आदरपूर्वक भेट घेत होते. ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतानाचे त्यांचे चित्रही दिवसभर चर्चेत राहिले. अखेर या मतदारसंघातून त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली.
समर्थकांच्या माघारीने बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा
करमाळा सोसायटी मतदारसंघातून शंभूराज जगताप यांच्यासाठी सुभाष गुळवे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. दक्षिण सोलापूरमधून श्रीदीप हसापुरे यांच्यासाठी भारती राजशेखर शिवदारे यांनी माघार घेतली. उत्तर सोलापूरमध्ये बाबासाहेब पाटील यांनी पृथ्वीराज माने यांच्यासाठी माघार घेतली. तर माढा मतदारसंघातून यशवंत शिंदे यांच्या बिनविरोध निवडीसाठी भारत शिंदे आणि गणपतराव साठे यांनी उमेदवारी मागे घेतली.
अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी झालेल्या या घडामोडींमुळे सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेष म्हणजे तीन आमदारांनी घेतलेली माघार आणि आठ उमेदवारांची बिनविरोध निवड यामुळे जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील राजकीय समीकरणे नव्याने चर्चेत आली आहेत. आता उर्वरित मतदारसंघांमध्ये कोणते उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.










