मुंबई : सोनिया गांधी यांच्या पुस्तकावरून सुरू झालेला राजकीय वाद आता आणखी चिघळला आहे. शिंदे गटाच्या नेत्यांनी सावरकरांवरील पुस्तकाचा निषेध करताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचाही फोटो फाडल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे चांगल्याच संतापल्या असून त्यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे.
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या ‘बिलॉन्गिंग अ जर्नी ऑफ लव्ह’ या पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण असल्याचा आरोप करत शिंदे गटाच्या प्रवक्त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पुस्तक फाडून निषेध व्यक्त करण्यात आला. मात्र, हा निषेध करताना शिंदे गटाच्या नेत्या शायना एनसी यांच्याकडून बाळासाहेब ठाकरे यांचाही फोटो फाडण्यात आल्याचा प्रकार घडला. त्यामुळे नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे.
या घटनेवर प्रतिक्रिया देताना सुषमा अंधारे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यांना राजकारणात ओळख निर्माण करून दिली, ज्यांना वर्षा आणि सह्याद्रीवर वावरण्याची पत मिळवून दिली, त्याच लोकांकडून आज बाळासाहेबांचा फोटो फाडला जात आहे, ही अत्यंत निषेधार्ह बाब असल्याचे त्या म्हणाल्या.
पुढे बोलताना अंधारे यांनी शिंदे गटावर कमिशनखोरी, दलाली, टेंडर आणि टक्केवारीच्या मुद्द्यांवरून टीका केली. ज्यांना वाचन संस्कृती आणि पुस्तकांचे महत्त्व कळते, ती माणसे कधीही पुस्तके फाडत नाहीत. ही कृती पराकोटीचा द्वेष आणि तिरस्कार दर्शवणारी असल्याचे त्यांनी म्हटले.
दरम्यान, सोनिया गांधी यांच्या पुस्तकावरून सुरू झालेला वाद आता बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटो फाडण्याच्या घटनेमुळे अधिकच चिघळला आहे. या प्रकरणावर शिंदे गटाकडून काय प्रतिक्रिया दिली जाते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.








