भारतीय क्रिकेटमधील युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या स्पर्धेत बिहारकडून खेळणारा वैभव आता उर्वरित सामने खेळणार नाही. आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेसाठी इंडिया-ए संघात त्याची निवड झाल्याने त्याला बिहार संघातून बाहेर पडावे लागले आहे. या स्पर्धेत तो अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा यांसारख्या स्टार खेळाडूंसोबत मैदानात उतरणार आहे.
बिहारचा नियमित कर्णधार साकिबुल गनी दुखापतीमुळे २०२६ च्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये खेळू शकत नाही. त्यामुळे सुरुवातीला वैभव सूर्यवंशीची बिहार संघात निवड करून पहिल्या दोन सामन्यांसाठी त्याच्याकडे कर्णधारपद सोपवण्यात आले होते. मात्र, इंडिया-ए संघात निवड झाल्यानंतर वैभवला बिहार संघाची साथ सोडावी लागली. त्यामुळे उर्वरित स्पर्धेत बिहारचे नेतृत्व करण्याची जबाबदारी सूरज कश्यप याच्याकडे सोपवण्यात आली आहे.
बाद फेरी गाठल्यास वैभवचे पुनरागमन?
बिहार संघासाठी आगामी सामने महत्त्वाचे ठरणार आहेत. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या ग्रुप बीमध्ये बिहारने अव्वल स्थान मिळवून बाद फेरीत प्रवेश केल्यास वैभव सूर्यवंशी पुन्हा संघात सहभागी होण्याची शक्यता आहे. मात्र, हे पूर्णपणे स्पर्धेतील वेळापत्रक आणि इंडिया-ए संघातील त्याच्या उपलब्धतेवर अवलंबून असेल.
ग्रुप बीमध्ये दिल्ली, सौराष्ट्र आणि तामिळनाडूसारख्या बलाढ्य संघांचा समावेश आहे. त्यामुळे बिहारसमोर बाद फेरी गाठण्याचे मोठे आव्हान आहे. वैभवच्या अनुपस्थितीत सूरज कश्यप बिहारला विजय मिळवून देण्यात कितपत यशस्वी ठरतो, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.











