---Advertisement---

नाशिक-अक्कलकोट प्रवास होणार सुसाट! १९ हजार कोटींचा महामार्ग

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट (प्रतिनिधी) – नाशिक ते अक्कलकोट प्रवास आता अधिक वेगवान आणि आरामदायी होण्याची शक्यता आहे. तब्बल १९ हजार कोटी रुपये खर्चून सहा पदरी महामार्ग उभारण्यात येणार असून, यामुळे प्रवासाच्या वेळेत मोठी बचत होणार आहे. विशेष म्हणजे, हा महामार्ग पुढे आंध्र प्रदेशपर्यंत जोडला जाणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह इतर राज्यांतील दळणवळणालाही मोठी चालना मिळणार आहे.

नाशिक-अक्कलकोट सहा पदरी महामार्गाची एकूण लांबी ३७४ किलोमीटर असून, या प्रकल्पासाठी सुमारे १९ हजार १४२ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. पंतप्रधान गती शक्ती राष्ट्रीय आराखड्यांतर्गत या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत या प्रकल्पाची माहिती दिली.

पाच जिल्ह्यांतून जाणार महामार्ग

हा महामार्ग नाशिक, अहिल्यानगर, बीड, धाराशिव आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांतून जाणार आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील दळणवळण अधिक सुलभ होणार आहे. महामार्गासाठी आवश्यक असलेल्या जवळपास ९० टक्के जमिनींसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आल्याची माहितीही देण्यात आली आहे.

नाशिक ते अक्कलकोट प्रवासात चार तासांची बचत

हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर नाशिक ते अक्कलकोट प्रवासाचा वेळ सुमारे चार तासांनी कमी होण्याचा अंदाज आहे. तसेच जवळपास ५१ किलोमीटर अंतराची बचत होणार आहे. दुसरीकडे, सुरत ते चेन्नईदरम्यानच्या प्रवासात सुमारे १४ तासांची बचत होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

समृद्धी महामार्गासह इतर मार्गांनाही जोडणार

या महामार्गाला नाशिकजवळ समृद्धी महामार्गाशी जोडण्यात येणार आहे. तसेच आडगाव येथून मुंबई-आग्रा महामार्गाशी जोडणी प्रस्तावित आहे. पुढे आंध्र प्रदेशपर्यंत विस्तार करण्याची योजना असून, वाढवण बंदराजवळ दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाशी जोडण्याचाही प्रस्ताव आहे.

तीन वर्षांत काम पूर्ण करण्याचे नियोजन

या महामार्गाच्या उभारणीमुळे मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होण्याची शक्यता आहे. प्रकल्पाचे काम तीन वर्षांच्या कालावधीत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. हा महामार्ग केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे, तर गुजरात, राजस्थान आणि आंध्र प्रदेशसारख्या राज्यांसाठीही महत्त्वाचा ठरणार आहे.

एकूणच, नाशिक-अक्कलकोट महामार्गामुळे प्रवासाचा वेळ आणि अंतर कमी होण्यासोबतच व्यापार, उद्योग आणि मालवाहतुकीला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!