अक्कलकोट, प्रतिनिधी : सामाजिक बांधिलकी जपत सिद्धार्थ सोशल फाउंडेशनच्या वतीने वसंत अंबाजी भांगे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिवाळीनिमित्त विशेष सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वागदरी (ता. अक्कलकोट) येथे पारधी समाज बांधवांसोबत दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी भाऊबीजेनिमित्त ओवाळणी व दिवाळी फराळ कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पारधी समाजातील महिला भगिनींनी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे औक्षण करून भाऊबीजेचा सण साजरा केला. त्यानंतर उपस्थित सर्वांनी एकत्रितपणे दिवाळी फराळाचा आस्वाद घेतला. या उपक्रमातून सामाजिक एकोपा, बंधुभाव आणि माणुसकीचा संदेश देण्यात आला.
याप्रसंगी बोलताना पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी म्हणाले की, सिद्धार्थ सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून चंद्रशेखर भांगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी राबविलेला हा सामाजिक उपक्रम कौतुकास्पद आहे. भाऊबीजेनिमित्त पारधी समाज बांधवांना भेटून मनापासून आनंद झाला. पारधी समाजाच्या विकासासाठी पोलीस प्रशासन कायम प्रयत्नशील राहील. समाजातील नागरिकांच्या स्थानिक समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी निश्चित प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
कार्यक्रमादरम्यान पोलीस अधीक्षकांनी पारधी समाज बांधवांशी संवाद साधत त्यांच्या विविध समस्या, अडचणी आणि अपेक्षा जाणून घेतल्या. समाजाच्या मुख्य प्रवाहातील सहभागासाठी अशा सामाजिक उपक्रमांची आवश्यकता असल्याचेही यावेळी अधोरेखित झाले.
या कार्यक्रमास लोकशाही न्यूजचे पत्रकार चंद्रशेखर भांगे, सिद्धार्थ सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष कमलाकर सोनकांबळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पनालकर, साहेबालाल सुभेदार, सुनील सावंत, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष लक्ष्मण सलगरे सदानंद माळगे, यांच्यासह अरुण भंडारे, शाम बाबर, असलम मुल्ला, ललिता भटारे, सागर वमने, सुनील इंडे, परमेश्वर नडगेरी आदी मान्यवर व पारधी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रम सामाजिक बांधिलकी, माणुसकी आणि बंधुभाव जपत साजरी झालेली ही दिवाळी पारधी समाज बांधवांसाठी आनंदाची व आपुलकीची ठरली.











