पुणे वृत्तसंस्था – पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथे गाडीला कट मारल्याच्या क्षुल्लक कारणावरून तीन अल्पवयीन मुलांनी एका तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात शिवम करमारे हा तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्या शरीरावर तब्बल ७०० टाके घालावे लागल्याची माहिती आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवम करमारे याचा गाडीला कट मारण्यावरून काही मुलांसोबत वाद झाला होता. याच वादाचा राग मनात धरून तीन अल्पवयीन मुलांनी त्याच्यावर धारदार कोयत्याने हल्ला केला. आरोपींनी शिवमच्या डोक्यावर, पाठीवर आणि हातावर सपासप वार केले. या हल्ल्यात त्याची तीन बोटे तुटली असून, एक हात कायमचा निकामी झाल्याची माहिती समोर येत आहे.
हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शिवमला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती गंभीर असून, उपचारादरम्यान त्याच्या शरीरावर तब्बल ७०० टाके घालावे लागल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, पुणे शहरासह ग्रामीण भागात कोयता हल्ल्यांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता वाढत आहे. किरकोळ कारणांवरून थेट जीवघेणे हल्ले होण्याचे प्रकार समोर येत असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनेतील अल्पवयीन आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.











