पुणे, वृत्तसंस्था : जेवणाचे बिल दिल्यावरून झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर मोठ्या हाणामारीत झाल्याची घटना लोणी काळभोर येथील कदमवाकवस्ती परिसरात घडली. जगदंबा हॉटेलमध्ये माजी सरपंच राहुल काळभोर आणि त्याच्या साथीदारांनी घुसून हॉटेल मालक, त्यांचे कुटुंबीय आणि कामगारांना मारहाण केल्याचा आरोप आहे. यावेळी काचेचे भांडे तोंडावर फेकून मारल्याने हॉटेल मालक जखमी झाले. या प्रकरणी राहुल दत्तात्रय काळभोर यांच्यासह चौघांविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री नऊच्या सुमारास कदमवाकवस्ती येथील एन्जेल हायस्कूलजवळ असलेल्या जगदंबा हॉटेलमध्ये हा प्रकार घडला. राजेंद्र चौधरी (वय ५६) हे गेल्या ३० वर्षांपासून हॉटेल चालवतात. घटनेच्या दिवशी रामचंद्र ऊर्फ रामभाऊ दत्तात्रय काळभोर हा जेवणासाठी आला होता. जेवणानंतर त्याने ऑनलाइन बिल भरले. बिल जमा झाल्याचे हॉटेल मालकाने सांगताच त्याने शिवीगाळ सुरू केली.
आवाज ऐकून हॉटेल मालकाचा मुलगा मयूर चौधरी (वय २२) तेथे आला. त्याने वाद मिटवण्याचा प्रयत्न केला असता रामचंद्रने त्यालाही शिवीगाळ आणि मारहाण केली. त्यानंतर मयूरने त्याला हॉटेलबाहेर काढले.
काही वेळातच रामचंद्रचा भाऊ आणि लोणी काळभोरचा माजी सरपंच राहुल काळभोर, स्वप्निल काळभोर व विकास काळभोर हे हॉटेलमध्ये आले. त्यांनी राजेंद्र चौधरी आणि कामगारांना मारहाण केल्याचा आरोप आहे. यावेळी स्वप्निल काळभोर याने काउंटरवरील बडीशेपेचे काचेचे भांडे उचलून राजेंद्र चौधरी यांच्या तोंडावर फेकून मारले. तसेच मध्यस्थी करण्यासाठी आलेले ग्राहक दीपक कुकरेजा आणि कामगार मिराज ऊर्फ शमामुल अन्सारी यांनाही मारहाण करण्यात आली.
पोलीस ठाण्यातून परतताना पुन्हा मारहाण
या घटनेची तक्रार देण्यासाठी मयूर चौधरी आणि त्याचा चुलत भाऊ ओम चौधरी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गेले होते. तक्रार देऊन हॉटेलकडे परतत असताना डॉमिनोज पिझ्झासमोर आरोपींनी त्यांना पुन्हा अडवले. राहुल, रामचंद्र, स्वप्निल आणि विकास काळभोर यांनी दोघांना शिवीगाळ करून मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.











