---Advertisement---

ऊसाच्या पैशांवरून आमदार राहुल पाटील वादात; शेतकऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप!

Follow Us:
---Advertisement---

परभणी, वृत्तसंस्था : मागील वर्षीच्या ऊस बिलातील थकीत १०० रुपयांची मागणी करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना दमदाटी आणि मारहाण केल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे आमदार तथा लक्ष्मी नरसिंह साखर कारखान्याचे चेअरमन राहुल पाटील यांच्यावर करण्यात आला आहे. या घटनेमुळे परभणीतील राजकीय आणि सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. ऊस उत्पादक संघर्ष शेतकरी समितीने या प्रकाराचा निषेध करत आंदोलनाचा इशारा दिला आहे.

लक्ष्मी नरसिंह साखर कारखान्याने मागील वर्षी ऊस उत्पादकांना प्रतिटन १०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. याच थकीत रकमेबाबत चर्चा करण्यासाठी आमरापूर येथील काही शेतकरी कारखान्यावर गेले होते. त्यावेळी राहुल पाटील यांनी शेतकऱ्यांच्या अंगावर धावून जात दमदाटी केल्याचा, तसेच मारहाण केल्याचा आरोप शेतकरी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. आमदारांनी शेतकऱ्यांशी जबाबदारीने आणि सामंजस्याने वागणे अपेक्षित असल्याचे समितीच्या नेत्यांनी म्हटले आहे.

कारखान्याकडे मागील वर्षातील सुमारे सव्वादोनशे रुपये प्रतिटन थकीत असल्याचा दावा समितीने केला आहे. तसेच चालू हंगामातील गाळपाचे पैसे आणि ऊस व साखरेच्या दरानुसार अंतिम दरही शेतकऱ्यांना मिळायला हवा, अशी मागणी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या थकीत पैशांचा प्रश्न मार्गी न लागल्यास आंदोलन छेडण्याचा आणि शेतकरीही दोन हात करतील, असा इशारा समितीने दिला आहे.

दरम्यान, खासदार संजय जाधव यांनीही या प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे. शेतकरी अडचणीत असताना त्यांचे म्हणणे समजून घेण्याऐवजी त्यांच्याशी गैरवर्तन करणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले. संबंधित शेतकऱ्यांकडे कारखान्याचे लेखी आश्वासन असल्याचा उल्लेख करत, दुसऱ्या कारखान्याच्या बरोबरीने पैसे देण्याचे आश्वासन पाळावे आणि शेतकऱ्यांशी बेईमानी करू नये, अशा शब्दांत त्यांनी राहुल पाटील यांच्यावर टीका केली.

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!