दिवाळी सणानंतर अनेकांना डोळ्यांची जळजळ, लालसरपणा, खाज येणे, डोळ्यांतून पाणी येणे आणि घसा खवखवणे अशा समस्यांना सामोरे जावे लागते. फटाक्यांचा धूर, धूळ आणि वाढलेले वायुप्रदूषण यामुळे हे त्रास उद्भवू शकतात. फटाक्यांमधून बाहेर पडणारे सूक्ष्म कण आणि रासायनिक घटक डोळ्यांच्या नाजूक पृष्ठभागावर परिणाम करतात. त्यामुळे विशेषतः ॲलर्जी किंवा डोळे कोरडे पडण्याचा त्रास असणाऱ्यांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.
डोळ्यांमध्ये दिसतात ही लक्षणे
प्रदूषणाच्या संपर्कात आल्यानंतर डोळे लाल होणे, जळजळ होणे, खाज सुटणे, कोरडेपणा आणि सतत पाणी येणे अशी लक्षणे दिसू शकतात. काहींना डोळ्यांत काहीतरी अडकल्यासारखे वाटते, तर काहींना प्रखर प्रकाश सहन होत नाही. धूर आणि प्रदूषित हवेमुळे घशात खवखव आणि अस्वस्थताही जाणवू शकते. ही लक्षणे सौम्य असली तरी त्याकडे दुर्लक्ष करू नये.
डोळ्यांची काळजी कशी घ्याल?
डोळ्यांना त्रास जाणवत असल्यास सर्वप्रथम धूर आणि प्रदूषणापासून दूर राहावे. डोळ्यांत धूळ किंवा बाह्य कण गेल्यास स्वच्छ पाण्याने किंवा निर्जंतुक सलाईनने हळुवारपणे धुवावेत. डोळे चोळणे टाळावे. बंद पापण्यांवर स्वच्छ थंड पट्टी ठेवल्याने जळजळ आणि खाज कमी होण्यास मदत मिळू शकते. डोळ्यांतील कण बोटाने किंवा कापसाने काढण्याचा प्रयत्न करू नये.
डोळ्यांत तीव्र वेदना होणे, अंधुक दिसणे किंवा प्रकाश सहन न होणे अशी लक्षणे आढळल्यास त्वरित नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. दिवाळीचा आनंद घेताना डोळ्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.











