सोलापूर, प्रतिनिधी : जिद्द, कल्पकता आणि काहीतरी नवे करण्याची इच्छाशक्ती असेल तर यशाचे शिखर गाठता येते, हे सोलापूरच्या शांभवी आजगुंडे या विद्यार्थिनीने सिद्ध केले आहे. लहान मुलांच्या सुरक्षेसाठी तिने ‘सेफ फ्लाय स्मार्ट आयडी कार्ड’ हे अनोखे उपकरण विकसित केले आहे. तिच्या या संशोधनाची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली असून, केंद्र सरकारकडून तिला जपानच्या शैक्षणिक दौऱ्याची संधी मिळाली आहे.
अक्कलकोट तालुक्यातील केएलई मंगरुळे हायस्कूलमध्ये शिक्षण घेणाऱ्या शांभवी रामण्णा आजगुंडे हिने बालसुरक्षेचा विचार करून हे स्मार्ट आयडी कार्ड तयार केले आहे. या उपकरणामध्ये कॅमेरा, ब्लूटूथ आणि जीपीएस यंत्रणा देण्यात आली आहे. त्यामुळे पालकांना मुलांच्या संपर्कात राहण्यास आणि त्यांच्या ठावठिकाण्याची माहिती मिळवण्यास मदत होऊ शकते.
या स्मार्ट कार्डमध्ये आपत्कालीन संदेश, फोटो-व्हिडिओ आणि व्हॉइस रेकॉर्डिंग यांसारख्या सुविधांचाही समावेश आहे. मुलांवर कोणतेही संकट ओढवल्यास त्याची माहिती पालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे उपकरण उपयुक्त ठरू शकते.
शांभवीच्या या प्रकल्पाचे केंद्र सरकारच्या विज्ञान मंत्रालयाच्या INSPIRE या राष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शनात सादरीकरण झाले. त्यानंतर दिल्लीतील भारत मंडपम येथेही तिने आपल्या संशोधनाचे सादरीकरण केले. या कामगिरीची दखल घेत तिला जपानच्या शैक्षणिक दौऱ्याची संधी मिळाली आहे. तसेच NASA संदर्भातील निवड प्रक्रियेतही तिचे नाव चर्चेत आल्याचे सांगितले जात आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थिनीने आपल्या कल्पकतेच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण केली आहे. शांभवीच्या या यशामुळे सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राचा गौरव वाढला आहे.











