---Advertisement---

जरांगे पाटील अमृता फडणवीसांना पाठवणार भाऊबीजेचा फराळ!

Follow Us:
---Advertisement---

बीड, वृत्तसंस्था : राज्यभरात दिवाळीचा उत्साह सुरू असताना आज भाऊबीजेनिमित्त राजकीय नेत्यांमध्येही सणाचा आनंद पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यातील भाऊ-बहीण नात्याची चर्चाही यानिमित्ताने रंगली आहे. अमृता फडणवीस यांनी जरांगे पाटील यांना घरी जेवणासाठी निमंत्रण दिले होते. त्यावर भाऊबीजेला बहिणीसाठी साडी-चोळी घेऊन जाईन, असे उत्तर जरांगे यांनी दिले होते.

आज भाऊबीजेनिमित्त जरांगे पाटील अमृता फडणवीस यांच्या घरी जाणार का, याची उत्सुकता होती. मात्र, आपण त्यांच्याकडे भाऊबीजेचा फराळ पाठवणार असल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले. आंदोलन सुरू असताना अमृता फडणवीस यांनी जेवणासाठी बोलावले होते; मात्र त्यावेळी आपण आंदोलनाच्या मैदानात होतो. मैदानात उतरल्यावर मागे फिरायचे नसते, असे सांगत त्यांनी त्या वेळी निमंत्रण स्वीकारता आले नसल्याचे स्पष्ट केले. तसेच, समोर आंदोलन सुरू असताना दाजीही होते, त्यामुळे आपण गेलो असतो तर दाजी आपोआप जिंकले असते, अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी केली.

भाऊबीजेसाठी निमंत्रणाची वाट पाहण्याची गरज नसते, असे सांगत जरांगे पाटील यांनी अमृता फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडेही आपल्या परीने फराळ पाठवणार असल्याचे सांगितले.

दरम्यान, अमृता फडणवीस यांनी यापूर्वी मनोज जरांगे पाटील हे आपल्याला भावासारखे असल्याचे म्हटले होते. सणासुदीच्या काळात माझा भाऊ जे काही करेल ते शांततेनेच करेल, असेही त्यांनी आंदोलनादरम्यान सांगितले होते.

दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी आज मुंबईतील रामटेक या पंकजा मुंडे यांच्या शासकीय निवासस्थानी भगिनी आणि राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्यासोबत भाऊबीज साजरी केली. यावेळी पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचे औक्षण केले. तर धनंजय मुंडे यांनी त्यांना भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्या. तसेच अंकिता पाटील ठाकरे यांनीही भाऊ राजवर्धन याचे औक्षण करून भाऊबीज साजरी केली.

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!