अक्कलकोट, तालुका प्रतिनिधी – पुणे येथे पार पडलेल्या विभागस्तरीय १९ वर्षांखालील अॅथलेटिक्स स्पर्धेत सी. बी. खेडगी महाविद्यालयाची धावपटू ज्योती यल्लप्पा बन्ने हिने उल्लेखनीय कामगिरी करत दोन रौप्यपदकांची कमाई केली. या यशामुळे तिने आगामी राज्यस्तरीय अॅथलेटिक्स स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे.
या स्पर्धेत ज्योतीने तीन किलोमीटर धावणे आणि क्रॉस कंट्री या दोन्ही प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला. दोन्ही स्पर्धांमध्ये तिने दाखवलेली शारीरिक क्षमता, वेग, सहनशक्ती आणि जिद्द यामुळे तिला दोन रौप्यपदकांनी गौरविण्यात आले. तिच्या या यशामुळे सी. बी. खेडगी महाविद्यालयासह अक्कलकोटच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अत्यंत कठीण असलेल्या लांब पल्ल्याच्या धावण्याच्या स्पर्धांमध्ये सातत्य, कठोर सराव आणि मानसिक कणखरता महत्त्वाची असते. ज्योतीने आपल्या मेहनतीच्या जोरावर विभागस्तरावर यश मिळवत राज्यस्तरीय स्पर्धेत प्रवेश निश्चित केला आहे. तिच्या या कामगिरीमुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
ज्योतीला क्रीडा शिक्षक प्रा. सोहेल शेख, जिमखाना विभागप्रमुख डॉ. दत्तात्रय बिराजदार आणि सुधीर राठोड यांचे मार्गदर्शन लाभले.
या उज्ज्वल यशाबद्दल संस्थेचे चेअरमन बसलिंगप्पा खेडगी, सचिव सुभाष धरणे, व्हाइस चेअरमन अशोक हारकुड, संचालक मंडळ, प्राचार्य डॉ. गुरलिंगप्पा धबाले, उपप्राचार्या वैदेही वैद्य, पर्यवेक्षक नीलप्पा भरमशेट्टी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी ज्योतीचे अभिनंदन करून आगामी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.











