पंढरपूर, प्रतिनिधी : आंबे (ता. पंढरपूर) येथे विहीर खोदकामादरम्यान माती व दगडाचा ढिगारा कोसळून झालेल्या दुर्घटनेत चार कामगारांचा मृत्यू झाला. तब्बल २५ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर प्रशासनाचे बचावकार्य पूर्ण झाले असून, चारही मृतदेह शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. या दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी संबंधित विहीर बुजविण्यात येणार असून, घटनेच्या सखोल चौकशीसाठी प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. समिती आठ दिवसांत अहवाल सादर करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिली.
रविवारी (ता. १५) सकाळी आंबे येथे विहीर खोदकाम सुरू असताना अचानक माती व दगडाचा मोठा ढिगारा कोसळला. त्यामुळे चार कामगार विहिरीत अडकले. घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन, पोलीस, महसूल विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. एनडीआरएफच्या पथकाने तांत्रिक कौशल्याच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. मात्र, ढिगाऱ्याचे प्रमाण आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे बचाव मोहिमेत मोठ्या अडचणी निर्माण झाल्या.
रविवारी रात्रीपासून सोमवारी सकाळपर्यंत टप्प्याटप्प्याने चारही कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. घटनास्थळीच वैद्यकीय पथकाने शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण केली. या मोहिमेत एनडीआरएफ, पोलीस, महसूल विभागाचे अधिकारी-कर्मचारी, आपदा मित्र आणि स्थानिक ग्रामस्थांनी समन्वयाने काम केले. जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी घटनास्थळी उपस्थित राहून बचावकार्यावर लक्ष ठेवले. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनीही मध्यरात्री घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
दरम्यान, भविष्यात अशा दुर्घटना घडू नयेत, यासाठी संबंधित विहीर एनडीआरएफच्या तांत्रिक सल्ल्यानुसार बुजविण्यात येणार आहे. परिसरात बॅरिकेडिंग करून सुरक्षेच्या उपाययोजना केल्या जाणार आहेत.
सुरक्षेच्या नियमांचीही होणार तपासणी
विहीर खोदकामादरम्यान आवश्यक सुरक्षा उपाययोजना केल्या होत्या का, मातीचा ढिगारा कोसळण्यामागील तांत्रिक कारणे कोणती, कामाच्या ठिकाणी निष्काळजीपणा झाला होता का, याची समिती चौकशी करणार आहे. आठ दिवसांत अहवाल सादर झाल्यानंतर दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या चौकशीतून केवळ दुर्घटनेचे कारणच नव्हे, तर कामगारांच्या सुरक्षिततेबाबतची जबाबदारीही निश्चित होण्याची अपेक्षा आहे.










