…तर राज्यात पुन्हा निर्बंध लावणार, मुख्यमंत्र्यांचीही इच्छा ; आरोग्य मंत्री राजेश टोपेंची मोठी माहिती
जालना : दिवाळीनंतर देशात कोरोनाने पुन्हा एकदा आपले हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. राज्यात कोरोनाची संख्या वाढत आहे. राज्यात सगळं पुन्हा सुरू झालं असलं तरी कोरोनाचा धोका कायम आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा निर्बंध लागू करणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली असून ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचीही इच्छा असल्याचे म्हणाले आहे. ते जालन्यामध्ये पत्रकारांशी बोलत होते
दरम्यान, लॉकडाऊन नसला तरी शिथिल केलेले निर्बंध पुन्हा लावण्यात येणार असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं. सार्वजनिक ठिकाणी नागरिक सोशल डिस्टन्सिंग पाळताना दिसत नाही. मास्क वापरले जात नाहीत. त्यामुळं आपल्याला काही कडक पावलं टाकावीच लागतील. सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढत आहेत. त्यामुळं तिथे जे निर्बंध शिथिल केले होते ते पुन्हा लावावे लागतील असं राजेश टोपे म्हणाले. सोशल डिस्टंसिंगचं पालन होत नसल्यानं राज्य सरकार हा कठोर निर्णय घेणार आहे. यावर पुढच्या दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर घोषणा होणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.