अमरावती: मोदी सरकाराच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी गेल्या 4 दिवसांपासून दिल्ली सीमेवर आंदोलन करत आहे. कृषी कायदे रद्द करण्यासाठी शेतकरी आंदोलन करीत आहेत. चार दिवस झाले तरी केंद्र सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केलेल्या नाहीत. त्याच पार्श्वभूमीवर राज्याचे जलसंपदा व शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनीही आता केंद्र सरकार विरोधात एल्गार पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या 3 डिसेंबरपर्यंत मंजूर करा, नाही तर शेतकऱ्यांना घेऊन दुचाकीवरून दिल्लीत धडक देऊ, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.
शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त आहेत. त्यावर तोडगा काढा. 3 डिसेंबरपर्यंत तोडगा न काढल्यास आम्ही हजारो शेतकऱ्यांना घेऊन दुचाकीवरून बैतूलमार्गे दिल्लीला धडक देऊ. मी प्रत्यक्ष उपस्थित राहून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देईल, असं त्यांनी सांगितलं.
केंद्र सरकारने सर्व शेतकऱ्यांना सन्मानाने दिल्लीत येऊ द्यावं आणि त्यांच्याशी प्रामाणिकपणे संवाद साधून तोडगा काढावा. यवतमाळ येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 50 टक्के नफा देऊन हमी भाव देतो असं सांगितलं होतं. तसं वचनच मोदींनी शेतकऱ्यांना दिलं होतं. त्यांनी त्याचं पालन करावं, असं आवाहनही त्यांनी केलं.