ध्यास विश्वसार्ह बातमीचा

तर हे मोहन भागवतांनाही अतिरेकी ठरवतील ; राहुल गांधीची मोदी सरकारवर टीका

नवी दिल्ली: शेतकरी आंदोलनाच्या मुद्यावर आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी आणि गुलाम नबी आझाद यांनी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या 2 कोटी सह्यांचे निवेदन त्यांनी राष्ट्रपतींना देऊन कृषी कायदामागे घेण्यासाठी हस्तक्षेप करण्याची विनंती केली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर घणाघाती हल्ला चढवला.

 

केवळ चारपाच उद्योगपतींसाठी काम करणारे हे सरकार आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवत आहे. उद्या जर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे मोदींविरोधात बोलल्यास त्यांनाही अतिरेकी ठरवलं जाईल, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी भाजपवर हल्ला चढवला.

 

तोपर्यंत शेतकरी मागे हटणार नाही

अजूनही वेळ गेलेली नाही. मोदी सरकारने शेतकऱ्यांचं ऐकावं. गेल्या 29 दिवसांपासून शेतकरी थंडीत कुडकुडत आंदोलन करत आहेत. संपूर्ण देश हे पाहत आहेत. कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. जोपर्यंत हे कायदे मागे घेतले जाणार नाहीत, तोपर्यंत हे शेतकरी मागे हटणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला.

 

 

संसदेत कोणतीही चर्चा न करता कृषी कायदा मंजूर करण्यात आला आहे. हा कायदा करताना शेतकऱ्यांशी साधी चर्चाही करण्यात आली नाही. पण शेतकऱ्यांना हा कायदा मान्य नाही. त्यामुळे पंतप्रधानांनी तात्काळ संयुक्त अधिवेशन घेऊन हा कायदा रद्द करावा, असं सांगतानाच सरकारने हा कायदा मागे न घेतल्यास त्याविरोधात विद्रोह करावाच लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!