मुंबई : विधिमंडळाच्या दोन दिवसाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. या अधिवेशनात काही मुद्द्यांवरुन सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यात चांगलीच जुगलबंदी झाल्याचे पाहायला मिळाली. त्यात सुधीर मुनगंटीवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातली जुगलबंदी चर्चेचा विषय ठरली.
माझ्या भाषणात जो अडथळा आणतो, तो पुन्हा कधी जिंकू शकत नाही, अशी आरोळी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी विधीमंडळातच ठोकली. त्यानंतर मुनगंटीवारांचं चॅलेंज थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वीकारलं. तुमचं आव्हान मी स्वीकारतो, मला पाडून दाखवा, असं खुलं आवताणच अजितदादांनी दिलं.
काय झालं सभागृहात?
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पुरवणी मागण्या, हक्कभंग प्रस्ताव अशा विविध मुद्द्यावरुन ठाकरे सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. विमानतळापेक्षा एसटी महत्त्वाची आहे, मुख्यमंत्री कार्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पैसे दिले, पण आमदारांच्या वाहनचालकांना दिले नाहीत. दिव्यांगांचे पैसे दिले नाहीत, असे दावे मुनगंटीवार करत होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला. त्यावर “माझ्या भाषणात जो अडथळा आणतो तो पुन्हा कधी जिंकू शकत नाही” असा फटकारा मुनगंटीवारांनी मारला. त्यावर अजित पवारांनीही तुमचं आव्हान मी स्वीकारतो, मला पाडून दाखवा, असं म्हणत सुधीर मुनगंटीवार यांना निरुत्तर केलं.
जुलै महिन्यांत अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि उद्धवजींचा वाढदिवस असतो. त्यामध्ये आई वडिलांची सेवा आणि त्याचे विचार पुढे नेले पाहिजे असं राशीत लिहिलंय. माझ्यासमोर आज बाळासाहेब ठाकरे दिसत आहेत, असा टोला मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला. आरक्षणाच्या मुद्यावरून नाराज असलेल्या मराठा आणि ओबीसी समाजाची नाराजी दूर करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने पुरवणी मागण्यात या दोन्ही समाजासाठी तरतूद केली आहे.