मुंबई: महाराष्ट्रात अघोषित आणीबाणी असल्याचा आरोप करणारे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिवसेनेनं ‘सामना’ अग्रलेखातून जोरदार हल्ला चढवला आहे. महाराष्ट्रात अघोषित आणीबाणी आहे. तसेच वातावरण तयार झाल्याचा सूर फडणवीस यांनी आळवला आहे. आणीबाणीसंदर्भात फडणवीस यांनी कोणतीही ठोस उदाहरणे समोर आणली नाहीत. पण राज्यातील वातावरण चांगले नाही, असे पालुपद त्यांनी चालवले आहे. ज्यांना महाराष्ट्रातील कथित आणीबाणीचा त्रास होतोय त्यांना देशातील एकांगी कारभार व हुकूमशाही प्रवृत्तीची भीती वाटत नाही. अठरा दिवसांपासून पंजाब-हरयाणाचा शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करतोय. त्यांच्यावर पाण्याचे फवारे मारणे, अश्रुधूर सोडणे यास आणीबाणीचा कोणता प्रकार मानायचा? महाराष्ट्रात आणीबाणी आहे की नाही हे जनता ठरवेल, पण दिल्लीच्या वेशीवर सुरू असलेल्या दडपशाहीचे काय? त्या आणीबाणीवर बोला असा टोला शिवसेनेने भाजपाला लगावला आहे.
एक वृत्तवाहिनीचा मालक मराठी उद्योजकास आत्महत्या करण्यास भाग पाडतो, हा साधा गुन्हा आहे काय? बाकी त्याने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा एकेरी, घाणेरड्या भाषेत उल्लेख केला ते तूर्त बाजूला ठेवा. त्याबद्दल भाजपाने त्याचे शाल व श्रीफळ देऊन कौतुक करावे, पण मराठी उद्योजकाने या माणसाच्या दहशतीखाली आत्महत्या केली, त्याचाही कायद्याने तपास करायचा नाही काय? मुंबईला पाकिस्तान, पोलिसांना माफिया वगैरे बोलणे हे विरोधी पक्षाला मान्य आहे काय? तसे असेल तर या नटीबाईची भाजपा कार्यालयात खणा-नारळाने ओटी भरावी! एकदा तुमचे संस्कार व संस्कृती चव्हाटय़ावर येऊ द्या अशा शब्दात शिवसेनेने भाजपावर हल्लाबोल केला आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना बऱयाच दिवसांनी सूर लागला असे वाटत होते, पण पहिली तान घेताच त्यांना टीकेची उबळ आली आणि सूर बिघडून गेले. कोणत्या वेळी कोणता राग गावा याचे शास्त्र आहे. पण शास्त्रीय गायन सुरू असतानाच ‘डीजे’ लावावा तसे घडले. महाराष्ट्राइतके मोकळे वातावरण जगात कुठेच नसेल. स्वतः फडणवीस, चंद्रकांत पाटील, आशीष शेलार यांच्यासारखे प्रमुख पुढारी रोज सरकारच्या विरोधात ‘डीजे’ लावल्याप्रमाणे ठणाणा करीत आहेत. रस्त्यांवर आंदोलन करीत आहेत. वृत्तपत्रांना मुलाखती देऊन खोटे आरोप करीत आहेत. सरकारच्या बदनामीच्या मोहिमा चालवीत आहेत.
हे सर्व सुरळीत चालू असताना सरकारी यंत्रणा विरोधकांची मुस्कटदाबी करीत आहे, असे हे लोक कोणत्या तोंडाने सांगतात? विधिमंडळांचे अधिवेशन सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी फेकूचंद पडळकरांसारखे नेते विधानसभेच्या दारात पारंपरिक ढोल वाजवून सरकारविरोधात नाचगाणे, घोषणाबाजी करीत होते. त्या ढोलवादनाचे थेट प्रसारण सर्व वृत्तवाहिन्या दाखवीत होत्या.
हुकूमशाही किंवा आणीबाणीसारखी परिस्थिती असती तर फेकूचंद पडळकरांना त्यांच्या ढोलासह तुरुंगात टाकले असते, पण फेकूचंदना लोकशाही मार्गाने ढोल वाजवून निषेध करण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळावे, अशी फेकूचंद यांची मागणी होती. धनगर आरक्षण, मराठा आरक्षण हे संवेदनशील विषय आहेत. कुणावरही अन्याय न होता आरक्षण मिळावे, ही शासनाची भूमिका आहेच.