अक्कलकोट, दि.१६ : अक्कलकोट तालुक्यातील दुधनी परिषदेच्यावतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साथरोग प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा भाग म्हणून शासनाच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेचा दुधनी येथे शुभारंभ करण्यात आला.
या मोहिमेअंतर्गत दुधनी शहरातील प्रत्येक कुटुंबाचे सर्वेक्षण होणार असल्याची माहिती मुख्याधिकारी अतिश वाळुंज यांनी दिली.यासाठी तीन कर्मचारी ग्रुपच्या माध्यमातून नऊ कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून प्रत्येक कर्मचारी हे प्रत्येक कुटुंबात जाऊन शरीराचे तापमान आणि पल्स ऑक्सिमीटर मशीनद्वारे पल्स रेट तपासत आहेत. दोन दिवसात दोनशे कुटुंबाचा सर्व्हे पूर्ण झाला आहे. जे संशयित आढळतील त्यांची वेगळी नोंद केली जाणार आहे. कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारने ही मोहीम प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.यासाठी जनतेचे सुद्धा प्रशासनाला सहकार्य आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर दुधनी नगर परिषदेकडून प्रत्येक प्रभागांमध्ये ही योजना प्रभावीरित्या राबविण्यात येत आहे. मुख्याधिकारी अतिश वाळुंज यांनी कुटुंब सर्वेक्षण कामाची प्रत्यक्ष पाहणी करत असून सर्वेक्षणासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना नागरिकांनी सहकार्य करावे,असे आवाहन केले आहे. यावेळी कार्यालयीन अधीक्षक चिदानंद कोळी, ग्रंथपाल एम. एस म्हेत्री, लिपिक एस. एम सर्वगोड, कर निरीक्षक राजेंद्र गुंड, लेखापाल विशाल चव्हाण, लिपिक आर. एस आपटे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
प्रशासनाला सहकार्य कराकोरोना हा रोग महाभयंकर असून त्यापासून अलिप्त राहणे हे फार महत्त्वाचे आहे त्यामुळे माझे कुटुंब म्हणून माझी जी काही जबाबदारी आहे ती ओळखूनच प्रत्येकाने प्रशासनाच्या या मोहिमेला सहकार्य करावे. प्रशासन आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घेत आहे.
अतिश वाळुंज, मुख्याधिकारी