पुणे : देशभरात कोरोना लसीची निर्मिती आणि त्याच्या वितरणाची जोरदार तयारी सुरू असताना या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (28 नोव्हेंबर 2020) पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झाले आहेत. यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. ‘दुनिया घुम लो’ शेवटी लस पुण्यातच सापडणार आहे असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे.
आम्हाला दिल्लीची सवय आहे. इथे मी ऐकलं १५०० कोटी, १६०० कोटींची विकासकामं होत आहेत. दिल्लीत तर एक लाख कोटींच्या पुढेच सगळ्या गप्पा असतात. आम्ही त्या गप्पा ऐकतो.. हे कोण बोलतं ते तुम्हाला माहित आहे. ते आज पुण्यात आलेत. दुनिया घुम लो पुण्याच्या पुढे काही नाही. जगभर फिरलात तरीही लस शेवटी पुण्यातच सापडणार आहे. ही लस पुणेकरांनी शोधली आहे नाहीतर कोणीतरी म्हणायचं मीच (स्वतःबाबत) शोधली अशा शब्दात सुप्रिया सुळेंनी मोदींवर निशाणा साधला आहे. त्या पुण्यात आयोजित मेळाव्यामध्ये बोलत होत्या.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झाले असून मोदी कॉन्फरन्सिंगद्वारे शास्त्रज्ञांशी संवाद साधणार असल्याची माहिती आहे. त्यानंतर लसीची चाचणी, त्याचे वितरण याचीही माहिती घेणार आहेत.