ध्यास विश्वसार्ह बातमीचा

दुर्दैवी घटना ! भंडारा जिल्हा रुग्णालयात आग; १० चिमुकल्याचा होरपळून मृत्यू

भंडारा : संपूर्ण देशाला हादरवणारी घटना भंडारा जिल्हा शासकीय रुग्णालयात घडलीय.भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात बालकांच्या दक्षता विभागाला ( SNCU) लागलेल्या आगीत दहा चिमुकल्याचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारच्या मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. दरम्यान, या आगीतून सात बालकांना वाचवण्यात यश आलं आहे.

रात्रीच्या वेळी रुग्णालयातील आऊट बाॅर्न युनिटमधून धूर निघत असल्याचे समोर आले. ड्युटीवर असलेल्या नर्सने दरवाजा उघडून पाहिले असता त्या कक्षात मोठ्या प्रमाणात धूर होता. तिनं लगेचच दवाखान्यातील अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. प्रशासनानं तातडीनं हालचाल करून अग्निशमन दलाला पाचारण केलं. अग्निशमन दलाच्या जवानांनी दवाखान्यातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. जिथं आग लागली होती, त्या विभागात आउटबॉर्न आणि इन बाॅर्न अशी दोन युनिट आहेत. यापैकी मॉनिटरमध्ये असलेले सात बालक वाचले. तर, आऊट बाॅर्न युनिटमधील दहा मुलांचा मृत्यू झाला.

राज्यातील सर्व रुग्णालयांचे तत्काळ ऑडीट करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश

भंडारा जिल्हा रुग्णालयाच्या नवजात शिशु केअर युनीटला आग लागून झालेल्या बालकांचा मृत्यूबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक असून सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनेच्या तत्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत. दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल तसेच अशा दुर्घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी राज्यातील अन्य रुग्णालयांतील शिशू केअर युनीटचे तातडीने ऑडीट करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि जिल्हा प्रशासनाशी आपण चर्चा केली असून रुग्णालयाची सेवा योग्य खबरदारी घेऊन पूर्ववत सुरु ठेवण्यात येईल असे पवार यांनी सांगितले आहे. तसेच अन्य बालकांवरील उपचार सर्व देखरेखीखाली करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहितीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!