मुंबई: राज्यातील महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज भाजपाकडून सरकारच्या कामाची पोलखोल करण्यात आली. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. हात धुवून मागे लागू म्हणणारे उद्धव ठाकरेंसारखा धमकावणारा मुख्यमंत्री इतिहासात पाहिला नाही, असा थेट हल्ला फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांवर केला. दरम्यान, फडणवीसांच्या या टीकेनंतर आता शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे.
आज विरोधी पक्षनेते असलेले देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या मुलाखतीत धमकीची भाषा केली. मला वाटत नाही की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असं कुठेही बोलले. मात्र फडणवीसांना जर ही धमकीची भाषा वाटत असेल तर देवेंद्र फडणवीस हे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा सरकारविरोधात बोलणाऱ्यांच्या कुंडल्या घेऊन बसलो आहे असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. ही भाषा तर भयंकर धमकीची होती. त्यांची अशी अनेक वाक्यं आहेत जी धमकी वाटू शकतात असंही संजय राऊत म्हणाले. म्हणजे सत्तेचा वापर करुन तुम्ही धमकी देऊ पहात होतात का? असाही प्रश्न संजय राऊत यांनी विचारला आहे. तसंच उद्धव ठाकरे हे फक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाहीत तर शिवसेना पक्ष प्रमुख आहेत हे कुणी विसरु नये असंही संजय राऊत म्हणाले.