नवी दिल्ली : रिपब्लिकन वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी आणि ‘बार्क’चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थ दासगुप्ता यांच्यातील संवाद उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे. दरम्यान या प्रकरणावरून आता काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. इतरांना देशभक्ती आणि राष्ट्रवादाचे सर्टिफिकेट वाटणाऱ्यांचा पर्दाफाश झाला आहे, अशा शब्दांत सोनिया गांधी यांनी अर्णव यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.
सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली आज काँग्रेस कार्य समितीची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. यावेळी त्यांनी अर्णव गोस्वामी यांचं नाव न घेता त्यांच्यावर हल्ला चढवला. जे लोक दुसऱ्यांना देशभक्ती आणि राष्ट्रवादाचे प्रमाणपत्रं देत होते. त्यांचा पूर्णपणे पर्दाफाश झाला आहे, असा हल्ला सोनिया गांधी यांनी चढवला. राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा अत्यंत गंभीर विषय आहे. गेल्या काही दिवसात गोपनीय माहिती समोर आली आहे. ही अत्यंत गंभीर बाब असून केंद्र सरकारने मात्र त्यावर मौन बाळगलं आहे, असा संताप त्यांनी व्यक्त केला.
एका आठवड्यानंतर संसदेचे अधिवेशन सुरू होणार आहे. आगामी अधिवेशन अर्थसंकल्पी असले, तरी जनहिताच्या मुद्द्यांवरही चर्चा होणे गरजेचे आहे. केंद्र सरकार यावर काय भूमिका घेते, ते पाहायला हवे, असे त्यांनी नमूद केले. दरम्यान, या बैठकीत काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक मेमध्ये घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.