नवी दिल्ली : आगामी दोन वर्षात भारत ‘टोल नाकेमुक्त’ होईल अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली. या निर्णयामुळे तोल नाक्यांवरील वाहतुकीची कोंडी संपुष्टात येणार टोलचे उत्पन्न देखील वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.असोचेम स्थापना सप्ताह २०२० यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये नितीन गडकरी बोलत होते.
तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, मागच्या वर्षभरापासून केंद्र सरकारने वाहनांना फास्ट टॅग सक्तीचं केले असल्याने इंधनातही मोठी बचत झाल्याचे आढळून आले आहे. मात्र अजुनही अनेक वाहनांनी फास्ट टॅग लावलेले नाही.
“ही जीपीएस प्रणाली लागू केल्यानंतर हे पैसे थेट बँक खात्यातून वजा केले जातील. वाहनांच्या हालचालीच्या आधारे हे पैसे वसूल केले जाणार आहेत,” असे गडकरींनी सांगितले.
दरम्यान, “राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) च्या टोलचे उत्पन्न ५ वर्षात १.३४ ट्रिलियनने वाढणार असून, हे सगळं जीपीएस तंत्रज्ञानाच्या वापरामुळे सहजशक्य होणार आहे. या तंत्रज्ञानामुळे व्यवहारांमध्ये पारदर्शकता येईल आणि कॅशलेस व्यवहारांना प्राधान्य मिळेल,” असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.
यावेळी येत्या २ वर्षांत संपूर्ण देश टोलनाका मुक्त केला जाणार असल्याचे गडकरी म्हणाले. त्यामुळे वाहनांना कोणत्याही प्रकारचा व्यत्यय न येता देशात कुठेही प्रवास करता येणं शक्य होणार आहे. रशियन सरकारच्या मदतीने ग्लोबल पोझिशनिंग सिस्टमला अंतिम स्वरूप देण्यात आलेलं असून, ही यंत्रणा लागू होताच भारत २ वर्षांत टोलमुक्त होणार आहे, असे त्यांनी सांगितले.