मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा या महिलेनं केलेले बलात्काराचे आरोप व त्यानंतर होत असलेल्या त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर शरद पवार यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी शरद पवार यांना धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी झाल्याशिवाय मुंडेंचा राजीनामा घेणार नाही, अशी रोखठोक भूमिका त्यांनी मांडली
“राजीनामाचा विचार करण्याची गरज आहे की नाही यात मतभिन्नता असू शकते. आरोप करणाऱ्याबाबत एकापेक्षा एक अधिक गोष्टी पुढे आल्यानंतर त्यातील सत्यता समोर आली पाहिजे. नाहीतर कुणावरही आरोप करायचे आणि सत्तेपासून दूर व्हा, अशी प्रथा पडू शकते. त्यामुळे त्याची सत्यता पुढे यावी”, अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली.
“पोलीस विभाग चौकशी करेल. आमचं हस्तक्षेप करण्याचं कारण नाही. चौकशी करताना एखादी एसीपी लेव्हलची महिला अधिकारी त्यात असावी. मुंडेंसह इतरांची माहिती घेऊन वस्तुस्थिती पुढे आणावी”, अशी सूचना शरद पवार यांनी दिली.
“मी काल बोललो तेव्हा संपूर्ण चित्रं नव्हतं. एखाद्या भगिनीने तक्रार केल्यावर तिची दखल घेतली. त्यामुळे गंभीर हा शब्द वापरला. आता सर्व चौकशी करावी आणि कुणावरही अन्याय होऊ नये असं वाटतं”, असं मत त्यांनी मांडलं.