मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेनं बलात्काराचे आरोप केला आहे. मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात एका महिलेनं धनंजय मुंडे यांच्याविरोधात तक्रार अर्ज दिला होता. यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. दरम्यान, धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. भाजप नेत्यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरल्याने मुंडे यांच्यासमोरील अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करून ही मागणी केली आहे. मुंडे यांनी आपल्या चुकीच्या कृत्यामुळे तात्काळ राजीनामा दिला पाहिजे. मुंडेंवरील लैंगिक शोषणाचे आरोप पाहता त्यांना मंत्रीपदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही. भाजप महिला शाखेने एक पत्रक काढून मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यामुळे आम्हीही या विषयावर आणखी जोरदार मागणी करत आहोत, असं पाटील यांनी म्हटलं आहे.
काल धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने शारिरीक अत्याचाराचे आरोप केल्यानंतर त्यांनी स्वत: फेसबुक पोस्ट लिहून याबाबत स्पष्टीकरण दिले असले तरी मात्र या प्रकरणी ते गोत्यात आल्याचे दिसून येत आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या आणि महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांनी कालच मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. आता थेट प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एका ट्विटच्या माध्यमातून त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.