मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्माच्या वकिलाने मोठा आरोप आहे. ही केस हाती घेतल्यापासून आपल्याला धमकीचे २००हून अधिक फोन आल्याचा दावा त्यांनी केला आहे.
बलात्काराच्या आरोपानंतर धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट करून, आरोप करणारी रेणू शर्मा ही करुणा शर्माची बहीण असल्याचे म्हटले होते. महत्त्वाचे म्हणजे “करुणा शर्मा हिच्याशी आपला सहमतीने संबंध होता, त्यांच्यापासून आपल्याला दोन अपत्ये आहेत,” असे धनंजय मुंडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले होते. तसेच रणू शर्माने केलेले आरोप खोटे आणि ब्लॅकमेल करणारे आहेत, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. तर, आज (शुक्रवारी) राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील या एकूणच प्रकरणाबाबत संशय व्यक्त करत मुंडे यांची पाठराखण केली आहे.
या पार्श्वभूमीवर रेणू शर्माच्या वकिलांनी आज (शुक्रवारी) पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. रेणू शर्मा केस लढवत असल्याने आत्तापर्यंत धमकीचे २०० फोन आल्याचा आरोप त्यांनी केला. माझा जीव राहिल्यास मी रेणू शर्मा या माझ्या अशिलाची केस लढवत राहीन, असेही ते म्हणाले. तसेच यासंदर्भात गृहमंत्री आणि पोलिसांना पत्र दिल्याचे त्यांनी सांगितले.
रेणू शर्माची नेमकी भूमिका काय?
रेणू शर्माने आधी माघार घेत असल्याचे सांगितले. ‘जे मला ओळखतात तेदेखील कोणतीही माहिती नसताना आरोप करत असतील तर, सर्वांनी मिळून निर्णय घ्या. तुम्हाला पाहिजे असेल तर तर, मीच माघार घेते, असे ट्विट रेणू शर्माने केले होते. पण आता ती शनिवारी सकाळी ११ वाजता माध्यमांशी संवाद साधणार असल्याची माहिती तिच्या वकिलांनी दिली.