सोलापूर, दि.24- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील आयक्यूएसी विभागामार्फत ‘नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंमलबजावणी’वर शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020 रोजी सायंकाळी पाच वाजता ऑनलाइन चर्चासत्राचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कुलसचिव डॉ. विकास घुटे यांनी दिली.
कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या ऑनलाइन चर्चासत्राचे उद्घाटन उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालिका डॉ. राजश्री देशपांडे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी विषयी सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. प्र-कुलगुरू डॉ. देबेंद्रनाथ मिश्रा यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे.केंद्र सरकारच्यावतीने तब्बल 34 वर्षानंतर नवीन शैक्षणिक धोरण आणण्यात आले आहे. या माध्यमातून पारंपारिक शिक्षण पद्धतीत बदल करण्यात आले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचाही नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणसंदर्भाविषयी दिशा व कार्यनिती (रोड मॅप) ठरवण्यासाठी या चर्चासत्राचा फायदा होणार आहे. याचबरोबर विद्यार्थी, शिक्षक, नागरिकांना नवीन शैक्षणिक धोरण संदर्भात सविस्तर माहिती व्हावी तसेच विचारमंथन व्हावे, याही उद्देशाने चर्चासत्राचे आयोजन करण्यात आल्याचे आयक्यूएसी विभागाचे संचालक डॉ. विकास पाटील यांनी सांगितले. आयक्यूएसी विभागाचे सदस्य डॉ. एस. डी. राऊत, प्रा. चंद्रकांत गार्डी, डॉ. शिवाजी शिंदे हे या चर्चासत्राचे नियोजन करीत आहेत.