ध्यास विश्वसार्ह बातमीचा

नाना पटोले महाराष्ट्राचे नवे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष?

नागपूर: राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्षाच्या निवडीसंदर्भातील हालचालींना वेग आला आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे नवे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यात काँग्रेसच्या हायकमांडने नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून नाना पटोले यांचे नाव निश्चित केले आहे. आता यावर अधिकृतरित्या शिक्कामोर्तब होणे बाकी आहे.

नाना पटोले हे राज्यातील एक आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. याशिवाय, ते ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व करतात. या दोन गोष्टी त्यांच्यासाठी जमेची बाब ठरल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, मंगळवारी दुपारी दिल्लीत राहुल गांधी पत्रकारपरिषद घेणार आहेत. यावेळी नाना पटोले यांच्या नावाची घोषणा होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये काँग्रेसला विदर्भात यश मिळाल्यानंतर राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी प्रदेशाध्यक्ष निवडीच्या चर्चेत उडी घेतली होती. ‘काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद विदर्भातील मंत्र्याला मिळावं’ अशी मागणी धानोरकरांनी केली आहे. बाळू धानोरकर यांनी हायकमांडची भेट घेत विदर्भासाठी दावेदारी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!