मुंबई । काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील राजकारणात फासे लवकरच पालटणार असल्याचे म्हणत सत्तांतराबाबत विधान केलं होत. त्याच संदर्भाने राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी फडणवीस आणि भाजप खासदार नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला.
“राणेसाहेब 22 वर्ष फासे पलटवण्याचं स्वप्न पाहत आहेत, त्यांना मुख्यमंत्री बनण्याची स्वप्नं पडत आहेत. त्यांना फासे पलटवता आलेच नाहीत, तीच देवेंद्र फडणवीस यांची अवस्था आहे. नारायण राणेंची 22 वर्ष मुख्यमंत्रिपदाची स्वप्न पाहण्यात गेली, आता देवेंद्र यांचीही जातील” असा टोला नवाब मलिक यांनी नारायण राणे आणि देवेंद्र फडणवीसांवर लगावला.
तसेच महाविकास आघाडी सरकार भक्कम आहे. विधानसभेत, ग्राम पंचायतीत महाविकास आघाडीला स्वीकृती मिळाली, त्यांना हे कळत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा प्रश्न निर्माण केला, तेव्हा का बोलले नाहीत? बूंद से गई तो हौद से आती नही अशी परिस्थिती आहे” असंही नवाब मलिक म्हणाले.
“दिल्लीतही 23-23 पक्षांचं सरकार होतं, तेव्हा ते का बोलले नाहीत? पक्ष चाकावर चालत नसतो, भाजपची कार्यपद्धती ही फुग्यासारखी आहे, एकदा हवा गेली की पुढे जात नाही. राज्यात भाजपचा फुगा फुटला, दिल्लीतही फुटणार आहे. चाकाने सरकार चालत नाही, विचारांनी चालतं असा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला.
“तुमचं कामच बंद खोलीतले आहे, दीपसिंह सिद्धूला बंद खोलीत तयार करुन शेतकरी आंदोलनात घुसवलं. आंदोलन बदनाम केलं, कटकारस्थान केलं. बंद खोलीतील नेत्यांनी बंद खोलीबद्दल बोलू नये. ते 95 लोक कुठे बेपत्ता झाले, त्यांचा तपास होणं गरजेचं आहे. बेपत्ता माणसांची माहिती देणं गरजेचं आहे” अशा शब्दात नवाब मलिक यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला.