पंढरपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या ऑनलाइन दर्शनाचे बुकिंग करून आलेल्या तीन हजार भाविकांना श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात मुखदर्शनासाठी सोडण्यात येत आहे. मात्र, आता ऑनलाईन बुकिंग न करता श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. 5 डिसेंबरपासून पंढरपूरच्या स्थानिक नागरिकांना रोज सकाळी 6 ते 7 यावेळेत घेता येणार आहे. यासाठी केवळ पंढरपूरमधील रहिवाशी असल्याचा पुरावा (आधार अथवा मतदान आळखपत्र)आवश्यक असणार आहे.
राज्यातील धार्मिक स्थळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली आठ महिन्यांपासून बंद करण्यात आली होती. श्री विठ्ठल – रुक्मिणी मंदिर देखील भाविकांसाठी बंद करण्यात आले होते. मात्र १६ नोव्हेंबरपासून राज्यातील सर्व मंदिरे भाविकांसाठी खुली करण्याचा आदेश शासनाने दिला. त्यानंतर श्री विठ्ठल – रुक्मिणी मातेच्या मुखदर्शनासाठी ऑनलाइन बुकिंग केलेल्या भाविकांना मंदिरात सोडण्यास सुरवात झाली होती.
सुरुवातीस एक हजार भाविकांना दिवसभरात मुखदर्शनासाठी सोडले जात होते. त्यानंतर त्यामध्ये वाढ करण्यात आली सध्या दिवसभरात तीन हजार भाविकांना मुख्य दर्शनासाठी प्रवेश दिला जात आहे.
पंढरपूरमधील स्थानिक नागरिकांना पूर्वी दररोज सकाळी सहा ते सात या वेळात ऑनलाइन दर्शनाचे बुकिंग केले नसले तरी मंदिरात प्रवेश दिला जात असे. आता 5 डिसेंबरपासून ही पद्धत पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. पंढरपुरातील स्थानिक नागरिकांना दररोज सकाळी सहा ते सात या वेळात मंदिरात मुखदर्शनासाठी प्रवेश दिला जाणार आहे. संबंधित नागरिकांना स्थानिक नागरिक असल्याविषयी आधार कार्ड अथवा मतदान कार्ड दाखवावे लागणार आहे.
दररोज सकाळी दहा ते अकरा आणि सायंकाळी चार ते पाच या वेळा व्यतिरिक्त सकाळी सात ते रात्री 10 या वेळात प्रत्येक तासाला दर्शनाचे ऑनलाईन बुकींग करून आलेल्या 250 लोकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. मंदिर समितीच्या वेबसाईट वरून ऑनलाइन दर्शनाचे बुकिंग करता येते. 65 वर्षाच्या पुढील लोक आणि दहा वर्षाच्या आतील मुले-मुली तसेच गर्भवती महिला, आजारी व्यक्ती यांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही असे मंदिर समितीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.