ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पक्षी वनांचे वैभव,चला त्यांचे संवर्धन करु,अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचे आवाहन

 सोलापूर,दि.५ : पक्षी वनांचे वैभव आहे. पक्ष्यांचे संरक्षण आणि संवर्धन करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. प्रत्येकांनी याकामी आपले योगदान द्यावे, असे आवाहन अरण्यऋषी साहित्यिक तथा सेवानिवृत्त वनाधिकारी मारुती चितमपल्ली यांनी आज येथे केले.

            सिद्धेश्वर वनविहार येथे अरण्यऋषी कक्षात श्री. चितमपल्ली यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. तेथे वनविभाग तसेच समाजातील विविध मान्यवरांनी श्री. चितमपल्ली यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना श्री.चितमपल्ली बोलत होते.

            राज्य शासनाच्या वन विभागामार्फत पक्ष्यांचे निसर्गातील  महत्त्व नागरिकांना कळावे, पक्ष्यांबाबत जाणीव वाढीस लागावी, यासाठी आजपासून 12 नोव्हेंबर 2020 पर्यंत पक्षी सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचा आज वाढदिवस आहे. तर जागतिक किर्तीचे पक्षीतज्ञ डॉ.सलीम अली यांची  12 नोव्हेंबर रोजी जयंती असते. यानिमित्ताने हा पक्षी सप्ताह आयोजित करण्यात आला आहे.

            श्री.चितमपल्ली म्हणाले, पक्षी वनाचे वैभव आहेत. हे वैभव जतन करण्याबरोबरच पुढील पिढीकडे आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने सोपवायचे आहे. यासाठी पक्षी तज्ञ आणि निरीक्षकांनी नव्या पिढीला या क्षेत्राची आवड निर्माण व्हावी, यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.

            अलीकडील काळात समाजातील विविध स्तरातील लोक पक्षीनिरीक्षणाकडे वळले आहेत. पण त्यांनी अधिक संशोधक वृत्तीने काम करावे. निरीक्षणाच्या नोंदी ठेवाव्यात. या नोंदीच्या आधारे  पक्ष्यांबाबतच्या माहितीचा ठेवा आपण पुढील पिढीकडे सुपुर्द करु शकु, असे आवाहनही श्री. चितमपल्ली यांनी केले.

            यावेळी वन विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या अरण्यऋषी कक्षाची श्री.चितमपल्ली यांनी पाहणी केली. सामाजिक वनीकरण विभागाच्या औषधी वनस्पतींच्या प्रदर्शनाचीही त्यांनी पाहणी केली. त्यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले.

            यावेळी मुख्य वनसंरक्षक सुजय डोडल, वनसंरक्षक (वन्यजीव) रमेश कुमार, उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, विभागीय वनाधिकारी सुवर्णा माने, सहाय्यक वनसंरक्षक के.एल.साबळे, बाबा हाके, चेतन नलावडे,  संध्याराणी बंडगर आदी उपस्थित होते.

            यावेळी आकाशवाणीचे सहाय्यक संचालक सुनिल शिनखेडे, डॉ.सुहास पुजारी, पद्माकर कुलकर्णी, डॉ.निनाद शहा, डॉ. व्यंकटेश मेतन, भरत छेडा, पप्पु जमादार यांच्यासह निसर्ग आणि पक्षी प्रेमी यांनी श्री. चितमपल्ली यांना शुभेच्छा दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!