ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पहिले हिंदकेसरी पैलवान श्रीपती खंचनाळे यांचं निधन

कोल्हापूर : भारताचे पहिले हिंदकेसरी पैलवान श्रीपती खंचनाळे यांचं कोल्हापुरात निधन झालं.  ते 86 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते अनेक व्याधींनी त्रस्त होते. खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  खंचनाळेंच्या निधनामुळे कोल्हापुरातील कुस्ती क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. दादू चौगुले यांच्यानंतर कोल्हापुरातल्या कुस्ती क्षेत्रातला आणखी एक तारा निखळला.

 

श्रीपती खंचनाळे यांचा जन्म १० डिसेंबर १९३४ रोजी शेतकरी कुटुंबात झाला होता. १९५९ मध्ये झालेल्या पहिल्या हिंद केसरी स्पर्धेत बनता सिंग यांना पराभूत करत श्रीपती खंचनाळे हे देशातील पहिले हिंद केसरी ठरले होते. त्याचवर्षी आनंद शिरसागर यांना पराभूत करत त्यांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धाही जिंकली होती.

 

खंचनाळे हे मूळचे सीमाभागातील चिक्कोडी तालुक्यातील एकसंबा गावचे होते. ते कित्येक वर्षांपासून कोल्हापुरात वास्तव्यास होते. विविध कुस्ती स्पर्धांत त्यांनी कोल्हापूरचा डंका देशभर वाजविला. नवीन मल्लांना तालमीत धडे देण्याचे काम ते करीत होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक मल्लांनी विविध कुस्ती मैदाने गाजवली होती.  दरम्यान, प्रकृती बिघडल्याने नोव्हेंबर महिन्यात त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांची प्रकृती अधिकच बिघडत गेली. अखेर आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!