अक्कलकोट, दि.१७ : पावसामुळे सध्या अक्कलकोट तालुक्यातील सिंदखेड ते अक्कलकोट रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली आहे त्यामुळे मोटयाळ आणि सिंदखेड ग्रामस्थांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
हे अंतर फक्त पाच किलोमीटरचे असून याकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे अडचणीत वाढ झाली आहे यामुळे छोटे छोटे अपघात होत आहेत.सिंदखेड हे गाव अक्कलकोट तालुक्याच्या उत्तरेस असून हा रस्ता पूर्णपणे उखडल्याने येथून वाहतूक करणे जिकिरीचे बनले आहे.या रस्त्यासाठी संबंधित खात्याने दुर्लक्ष केल्यामुळे ग्रामस्थ तीव्र संताप व्यक्त करत आहेत.
या रस्त्यावर सतत वर्दळ असते. विशेषतः मोटयाळ, कुरनुर, कोळेकरवाडी गावातील नागरिक सतत ये-जा करत असतात. तसेच सोलापूर हायवे साठी लागणारे मुरूम याच मार्गावरून जात असल्याने रस्त्याची वाट लागली आहे.जड वाहनांची वाहतूक व सार्वजनिक बांधकाम खात्याने केलेले दुर्लक्ष यामुळे ग्रामस्थांचे हाल होत आहेत.सध्या रस्त्यावर ठिक-ठिकाणी खड्डे पडले आहेत. व त्या खड्यांनी पाणी साचले आहे. रस्त्यावरील खडी पूर्णतः उखडल्याने रस्त्याचे अस्तित्वच संपुष्टात आले आहे. वाहन धारकांना वाहन चालविताना अक्षरशः कसरत करावी लागते. याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष घालून त्वरित काम सुरू करावे,अशी मागणी नागरिकांतुन होत आहे.
रस्ता मंजूर
पण काम कधी ?
याबाबत चौकशी केली असता रस्ता मंजूर आहे पण काम सुरू होत नाही याबाबत पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नाही. त्यामुळे अजून लोकांचे किती दिवस हाल होणार असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे.