अक्कलकोट, दि.१६ : अक्कलकोट तालुक्यातील दुधनी नगरपरिषदेने पीएम स्वनिधी कर्ज वितरणामध्ये सोलापूर जिल्ह्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. याबद्दल जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि जिल्हा प्रशासन अधिकारी पंकज जावळे यांनी पालिका कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.काही दिवसांपूर्वी नगरपरिषदेकडून गरीब व्यक्तींना स्वनिधी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार केंद्र शासन पुरस्कृत पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत शहरातील १३६ उद्दिष्ट फेरीवाल्यांना पैकी ७९ फेरीवाल्यांना व्यवसायासाठी बँक ऑफ महाराष्ट्र कडून प्रत्येकी दहा हजार रुपये प्रमाणे ७ लाख ९० हजार ५६ तर सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून प्रत्येकी दहा हजार रुपये प्रमाणे ५ लाख ६० हजार असे एकूण १३ लाख ५० हजार रुपये कर्ज वितरण करण्यात आले. शंभर टक्के उद्दिष्ट साध्य करून दुधनी नगरपरिषद जिल्ह्यात अव्वल क्रमांकाने आली आहे. कर्ज घेतलेल्या व्यक्तीने कर्जाची नियमित परतफेड करून सहकार्य करावे, असे आवाहन अतीश वाळुंज यांनी केले आहे. यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा अधिकारी शिवकुमार सोप्पीमठ, सेंट्रल बँकेचे शाखाधिकारी सुमित भंडारी व नगरपरिषदेचे समूह संघटक अमित बुरानपुरे यांचे मुख्याधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. दरम्यान नगर परिषदेच्यावतीने दीनदयाळ अंत्योदय योजना अंतर्गत स्थापन केलेल्या चार महिला बचत गटांना फिरता निधी वितरित करण्यात आला आहे.यापूर्वी २० महिला बचत गटाला २७ लाख रुपये बँक ऑफ महाराष्ट्र आणि आयसीआयसीआय बँक यांच्या माध्यमातून कर्ज वितरित करण्यात आल्याचेही मुख्याधिकारी वाळुंज यांनी सांगितले.याशिवाय या अभियानांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या महिला बचत गट, वस्ती स्तर संघ व शहर स्तर संघ यांना वेळोवेळी वेगवेगळ्या विषयांचे प्रशिक्षण देऊन सक्षम करण्यात येत आहे. भविष्यात प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.