अक्कलकोट,दि.२० : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या सोलापूर विद्यापीठातील नियोजित पुतळ्याच्या उभारणीकरिता गठीत करण्यात आलेली समिती ही सर्वसमावेशक आहे याबाबत कोणीही आक्षेप घेण्याची आवश्यकता नसून सर्व जातीधर्मासाठी आयुष्य झिजवलेल्या अहिल्यादेवी यांना जातीच्या बंधनात बांधून त्यांचे व्यक्तिमत्व खुजे करू नये,असे आवाहन अक्कलकोट राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिलीपभाऊ सिध्दे यांनी केले आहे.
धनगर समाजाच्या वतीने सदर पुतळा समितीस विरोध झाल्याच्या पार्श्वभूमीवर सिध्दे यांनी ही भूमिका मांडली आहे. यावेळी बोलताना सिध्दे म्हणाले, एकूण अठरा सदस्यांच्या या समितीत धनगर समाजाचे अकरा सदस्य आहेत. त्यामुळे समाजावर अन्याय झाला असे म्हणता येणार नाही. आ. रोहित पवार यांच्या नावाबद्दल घेतलेल्या आक्षेपाला उत्तर देताना सिध्दे म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे चौंडी हे जन्मगाव असून सदर गाव कर्जत जामखेड मतदारसंघातील आहे. ज्यांचा पुतळा उभारला जात आहे त्यांच्या जन्मगावाचा लोकप्रतिनिधी म्हणून आ. रोहित पवार यांचा समितीत समावेश झाला आहे. व या मतदारसंघातील बहुसंख्य असलेल्या धनगर समाजबांधवानी मोठ्या मताधिक्याने निवडून दिलेला नेता समितीत असेल तर ही तमाम धनगर समाज बांधवांसाठी अभिमानाची बाब आहे. आ. रोहित पवार हे महाराष्ट्रव्यापी अभ्यासू नेतृत्व असून शिक्षणाबद्दल आस्था असणारा नेता आहे. त्यांच्या समितीतील समावेशामुळे सोलापूर विद्यापीठात सर्वव्यापी सुधारणा मार्गी लागतील.
तसेच आ. रोहित पवार यांनी सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील बंद साखर कारखाना चालू करून इथल्या उद्योगविश्वात जान आणली आहे. इतर तालुक्यातील आजारी कारखान्यांना उर्जितावस्था देण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. सोलापूर जिल्ह्याची बेकारी कमी करून रोजगारसंप्पन्न जिल्हा बनवण्यास ते प्रयत्नशील आहेत.
सदर पुतळा समिती मध्ये जिल्ह्यातील सर्व क्षेत्रातील नामवंत सर्वपक्षीय व्यक्तींचा समावेश असून आक्षेप घेण्यासारखे कांहीही नाही. तरी आहे हीच पुतळा समिती अंतिम ठेऊन लवकरात लवकर पुतळा उभारणी कामाला सुरुवात व्हावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली
सोलापूर जिल्ह्यात धनगर समाजचा लोकप्रतिनिधी एकही निवडून आला नाही.विशेष करून जेष्ठ नेते गणपतराव देशमुख या समितीत आहेत. या साठी धनगर समाज नाराज होण्याची गरज वाटत नाही. गठीत समिती योग्यच आहे.यावेळी शहराध्यक्ष मनोज निकम, महादेव वाले ,प्रा.प्रकाश सुरवसे, वाहीद वळसंगकर, विक्रांत पिसे, माणिक बिराजदार, शंकर व्हनमाने , शिवराज स्वामी, राम जाधव, राजरतन बाणेगाव,शंकर पाटील,अर्जून बनसोडे,विशाल राठौर, ईसमाईल फुलारी,संजय घोडके, राहुल किरनळळी आदी उपस्थितीत होते.