अक्कलकोट, दि.२० : राज्यात पूरग्रस्तांच्याबाबतीत नुसती आश्वासने आणि चर्चाच सुरू आहेत.पुलावर थांबून काही होणार नाही तर प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मदत करायला हवी.त्यात हे सरकार कमी पडत असल्याची टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी
केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सोमवारी अक्कलकोट
दौरा संपल्यानंतर त्यांनी आज अक्कलकोट तालुक्यातील
बिंजगेर, संगोगी(ब), रुड्डेवाडी, आंदेवाडी या भागातील पुरात
वाहुन गेलेल्या शेतकऱ्यांच्या घराची, शेतीच्या नुकसानीची पाहणी केली.त्यावेळी ते बोलत होते.मुख्यमंत्र्यांनी सोमवारी सांगवी बुद्रुक येथे पुलावरूनच नुकसानीची पाहणी केली होती.त्याबाबतही त्यांनी टीका करत सरकारला
लक्ष्य केले.पुढे बोलताना दरेकर म्हणाले की,पुराबाबत पाहणी करून शेतकऱ्यांना विचारपूस केली असता, लोक ढसाढसा
रडत आहेत. अशा प्रसंगी केवळ शासकीय नियमावर बोट ठेवून बघू, करू असे न म्हणता लोकांना तात्काळ मदतीची गरज आहे.त्याचे नियोजन करा, केवळ आश्वासन देऊन नका. यापूर्वी शेतकऱ्यांना कोरडवाहु शेतीला नुकसान भरपाई म्हणून हेक्टरी २५ हजार तर बागायतीसाठी ५० हजार देण्याचे आश्वासन ठरले आहे. त्यानुसार त्यांना तात्काळ मदत द्यावी. दिलेले वचन पाळावे. अन्यथा या नुकसानीत शेतकऱ्यांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला.
या महापुरात शेतकऱ्यांचे सर्वकाही वाहुन गेले आहे. संसार उघड्यावर पडले आहे.अशा परिस्थितीत
शासनकर्त्यांनी केवळ पुलावर थांबून पाहून चालणार नाही. तर त्यांना दिलासा देण्याची गरज आहे. असे होत नसेल तर आता रस्त्यावर उतरावे लागेल,असा इशारा देत तुम्ही काळजी करू नका,तुम्हाला भरघोस मदत मिळवून दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही,अशी ग्वाही दरेकर
यांनी दिला.या दौऱ्यात खासदार डॉ.जयसिद्धेश्वर म्हास्वामीजी, आमदार सचिन कल्याणशेट्टी,आमदार राम सातपुते, आमदार गोपीचंद पडळकर, भाजपध्यक्ष मोतीराम राठोड, शिवशरण जोजन, तालुका महिला प्रमुख सुरेखा होळळीकट्टी, आनंद तानवडे, महेश हिंडोळे, कांतू धनशेट्टी, अरविंद ममनाबद, राजशेखर पाटील, अतुल मेळकुंदी, अप्पू परमशेट्टी, राजशेखर मसूती, दयानंद बमनळळी, बाळा शिंदे, अविनाश मडीखांबे, राहुल रुही आदी सहभागी झाले होते. नदीकाठच्या अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकाबरोबर घरातील संसारपयोगी साहित्य,अन्नधान्य, कपडे,सुद्धा वाहून गेले आहेत.सध्या खायला शिल्लक राहिलेले नाही.तरी शासनाने तात्काळ सर्व सुविधा निर्माण करून द्यावे,असे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितले. यावेळी बोरी उमरगे, रामपूर,मिरजगी, बिंजगेर,
संगोगी, रुददेवाडी आदी गावच्या नागरिकांनी निवेदन दिले.
– दौऱ्यापेक्षा त्यांना
थेट मदत द्या
डोळ्यासमोर झालेले नुकसानीचे दृश्य पाहून वेदना होत आहेत. जमिनी खरडून गेल्याने रब्बी पेरणी करता येणार नाही.तूर्त आर्थिक मदत करून तरी शेतकऱ्यांना धीर देण्याचे काम तरी या सरकारने करावे.दौऱ्यापेक्षा त्यांना थेट
मदत द्या.
सचिन कल्याणशेट्टी,आमदार