ध्यास विश्वसार्ह बातमीचा

प्रवाशांच्या सेवेसाठी आता एसटीची नाथजल शुद्धपेयजल योजना,परिवहन महामंडळाने घेतला पुढाकार

 

मारुती बावडे

अक्कलकोट, दि.२ : एसटीच्या लाखो प्रवाशांना आता स्वस्त दरामध्ये दर्जेदार आणि शुद्ध पाणी मिळणार आहे.“नाथजल” या संकल्पनेतुन महामंडळ प्रवाशांना ही सुविधा उपलब्ध करून देणार आहे.

शुद्ध पेयजल योजनेचे लोकार्पण परिवहन मंत्री अनिल परब यांच्या हस्ते करण्यात आले आहे.या योजनेअंतर्गत महामंडळाच्या प्रत्येक बस स्थानकावर महामंडळाचे अधिकृत बाटली बंद पेयजल उपलब्ध करून देण्यात येणार आहे म्हणून त्याचे नामकरण नाथजल असे करण्यात आले आहे. महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची महान परंपरा लाभली आहे त्या वारकरी संप्रदायामध्ये आपल्या गुरूला ‘नाथ’ या नावाने संबोधले जाते त्यांच्या आदर प्रित्यर्थ एसटीच्या अधिकृत बाटलीबंद पेयजलास नाथजल हे नाव देण्यात आले आहे.
संपूर्ण राज्यात बाटलीबंद पाणी पुरविण्यासाठी मे.शेळके बेव्हरजेस प्रा.लि. पुणे (Oxycool) या संस्थेची निवड करण्यात आली असून सर्व बस स्थानकावर ६५० मिलीमीटर व १ लिटर बाटलीबंद स्वरूपामध्ये हे “नाथजल” विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. यांचा दर अनुक्रमे १० रुपये व १५ रुपये इतका असणार आहे,
अशी माहिती एस.टी. महामंडळाकडून देण्यात आली आहे.टप्याटप्याने राज्यातील सर्व बसस्थानकावर नाथजल हे एसटी महामंडळाचे अधिकृत पेयजल उपलब्ध होणार आहे. अर्थात त्यामुळे बसस्थानकावर कोणत्याही इतर कंपन्यांचे पेयजल विकण्यास बंदी असेल. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना किफायतशीर दरामध्ये दर्जेदार शुद्ध पेयजल उपलब्ध करून देण्याची हमी एसटी महामंडळाने उचलली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!