अक्कलकोट, दि.१० : अक्कलकोट मतदारसंघात एकुण चौदा गावाच्या निवडणुका बिनविरोध पार पडल्या आहेत यापूर्वी मी बिनविरोध गावांना १५ लाख रुपयांचा विकास निधी देण्याचे जाहीर केले होते त्यानुसार या गावांना दिलेला शब्द मी पाळणार आहे,असे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सांगितले.
तालुक्यात ७२ गावच्या निवडणुका सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर ते पत्रकारांशी बोलत होते. या १४ गावातील ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध पार पडल्या ही आपल्या सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे. आंदेवाडी बु, शिरशी, उडगी, मातनहळळी, नागनहळळी, तोळनूर, हंद्राळ , कुमठे, बणजगोळ, बोरामणी, संगदरी, तिर्थ, दिंडूर, लिंबीचिंचोळी इत्यादी गावांनी निवडणूक बिनविरोधसाठी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या चौदा गावातील समस्त ग्रामस्थांचे, राजकीय पदाधिकाऱ्यांचे आणि कार्यकर्त्यांचे यानिमित्ताने आभार मानतो.आपण सर्वांनी गावातील एकोपा कायम राहावा म्हणून एकत्र येऊन निवडणुकीचा खर्च वाचवून गावाच्या भल्याचा विचार केला आहे.
मी जाहीर केल्याप्रमाणे ज्या गावात बिनविरोध ग्रामपंचायत निवडणूक पार पडेल अश्या गावांना प्रत्येकी पंधरा लाख रुपये विकासनिधी उपलब्ध करून देणार हा शब्द पाळणार आहे. तुम्ही माझ्या आवाहनाचा मान राखलात, मी पण माझ्या शब्दाला जागणार आहे,असे कल्याणशेट्टी यावेळी म्हणाले. तसेच ज्या ठिकाणी निवडणुका लागल्या आहेत त्या ठिकाणीदेखील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी निवडणुका शांततेत पार पाडून प्रशासनाला सहकार्य करावे,असे आवाहन त्यांनी केले आहे.