ध्यास विश्वसार्ह बातमीचा

भगवान भाऊंच्या निधनाने अक्कलकोट तालुक्याला मोठा धक्का,न भरून येणारी पोकळी

 

अक्कलकोट, दि.८ : संपूर्ण अक्कलकोट तालूक्यासाठी सोमवारची सकाळ धक्कादायक ठरली.गोकुळ शुगर्स,धोत्री या संस्थेचे चेअरमन भगवान भाऊ शिंदे यांची सोलापूरात रेल्वे रूळावर झालेल्या अपघातात निधन झाल्याची बातमी
संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरली,अन् सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला.अक्कलकोट तालूक्यातील दहिटणेसारख्या छोट्याशा गावात १९५४ साली भगवान भाऊ शिंदे यांचा जन्म झाला.वडिल स्व.दत्तात्रय शिंदे व आई अंजनाबाईंच्या यांच्या संस्कारात भगवान शिंदेंचे आयुष्य सुरू झाले.संपूर्ण शिंदे कुटूंबाचा उदरनिर्वाह अल्पशा शेतीवर अवलंबून होता.त्यातच वडिलांचे छत्र लहानपणीच हरवल्याने संपूर्ण कुटूंबाची जबाबदारी भगवान शिंदेसह इतर तीन भावंडांवर पडली.ज्या वयात हसणे,खेळणे आणि शिक्षण घेणे ठरलेले असते,त्या वयात संपूर्ण कुटूंबाची जबाबदारी चारही भावंडांवर पडली.समाजात वावरत असताना ज्या अडचणी भगवान शिंदेंना लहानपणी दिसल्यानंतर त्यांच्या मनात समाजकारणाची भावना जन्मास आली.आणि यातुन भगवान शिंदेंसारख्या समाजकारणी कार्यकर्तृत्वाचा फायदा संपूर्ण अक्कलकोट तालूक्यास झाला.
भगवान शिंदे यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात राजकारणापेक्षा समाजकारणाला प्राधान्य दिले.त्यांच्या हयातीत त्यांनी लोकशाहीतील कोणत्याही पदाविना लोकोपयोगी कार्य केले.
संपूर्ण चपळगाव गटात भगवान शिंदे हे सर्वांशी मिळून मिसळून राहायचे.प्रत्येकाच्या अडीअडचणीत धावून जाणारा लोकहितवादी तत्वाचा नेता म्हणून त्यांची ओळख होती.आणि म्हणूनच त्यांना भाऊ या नावाने संबोधले जायचे.चपळगाव पंचक्रोशीतील शेतकऱ्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते होते.
‍‍‍‍ ज्या ज्या वेळी चपळगाव पंचक्रोशीत दुष्काळ पडला,त्या त्या वेळी भगवान शिंदे व संपूर्ण शिंदे कुटूंबांनी स्वतःच्या शेतातील पिके वाळवून पाणीपूरवठा केल्याची बाब जनता कधीच विसरणार नाही.जनतेच्या दुव्याने शिंदे परिवाराने चालविलेल्या कोणत्याही उद्योगधंद्यात त्यांना अडचण आली नाही.अक्कलकोट तालूक्यातील ऊस उत्पादकांची अडचण भगवान शिंदेंच्या नजरेतुन हटली नाही.मग भाऊंनी माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांच्या खांद्याला खांदा लावून शेतकऱ्यांच्या उद्धारासाठी म्हेत्रे साहेबांच्या नेतृत्वाखाली रूद्देवाडीच्या माळरानावर मातोश्री शुगर्सची स्थापना केली.यानंतर भगवान भाऊ कधीच थांबले नाहीत.तडवळ व धोत्री या ठिकाणी साखर कारखान्याची निर्मिती करून संपूर्ण अक्कलकोट तालूक्यातील शेतकऱ्यांसाठी ऊसाचा प्रश्न मिटवला.शेतकरी जगला तरच देशात लोकशाही नांदेल या तत्त्वाने जगणारे भगवान भाऊ होते.

तालूक्याच्या माथी असलेला दुष्काळाचा कलंक पूसावा यासाठी जलसंधारणाची कामे भगवान भाऊ स्वतःच्या देखरेखेखाली करायचे.दहिटणेसारख्या छोट्याशा गावात जन्मलेले भाऊ स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन चटणी,भाकरी अनेकदा आनंदाने खायचे.आधूनिक शेती व तंत्रज्ञान फार गरजेचे आहे,असा सल्ला ते वारंवार देत असे.
त्यांनी कधीच श्रीमंतीचा देखावा केला नाही.गरीबी मिटविण्यासाठी त्यांनी स्वतःच्या कारखान्यात तालूक्यातील अनेक गरीब कुटूंबातील बेरोजगारांना घेतले.
त्यांच्याकडे गेलेल्या प्रत्येक गरजूला ते सढळ हाताने मदत करायचे.राजकारणातील कोणत्याही पदाविना भगवान भाऊंनी संपूर्ण आयुष्यभर समाजकारण केले.
समाजकारण व सहकार क्षेत्रातील एक निष्ठावंत हरपल्याची भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात मराठा समाजातील जागरूक असणारा लोकहितवादी नेता हरपल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!