मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या स्नुषा भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांचा भाजपच्या वेबसाईटवर आक्षेपार्ह उल्लेख करण्यात आला असल्याचे निदर्शनास आल्याने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्याची गंभीर दखल घेतली आहे. मात्र, गुगल ट्रान्स्लेटमुळे हा सगळा गोंधळ निर्माण झाल्याचे दिसत आहे.
रक्षा खडसे यांच्याबद्दल भाजपच्या वेबसाइटवर आक्षेपार्ह उल्लेख असल्याचा स्क्रीनशॉट जोडत पत्रकार स्वाती चतुर्वेदी यांनी एक ट्वीट केलं आहे. ज्यात भाजप खासदार रक्षा खडसे यांच्याविषयी भाजपच्या अधिकृत वेबसाईटवर “समलैंगिक” असल्याचे आक्षेपार्ह वर्णन होते. यावरून पत्रकार म्हणवल्या जाणाऱ्या स्वाती चतुर्वेदी यांनी कोणतीही जास्त माहिती न घेता तो फोटो शेअर करत त्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, पीएमओ इंडिया यांना टॅग करत जाब विचारण्याचा प्रयत्न केला.
स्वाती चतुर्वेदी यांच्या या ट्वीटची ‘तत्परतेने’ दखल घेत महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनीही भाजपला कारवाईचे संकेत दिले. स्वाती चतुर्वेदी यांचे ट्वीट शेअर करताना गृहमंत्री म्हणाले की, महिलांविषयीचा हा अनादर सरकार खपवून घेणार नाही आणि जबाबदार व्यक्तींवर कारवाई करण्याची तयारी त्यांनी दर्शवली.
परंतु, गुगल ट्रान्सलेट कसे काम करते हे जर त्यांना कळले असते तर त्यांचेच हसे झाले नसते. त्यांनी ट्वीट आधी भाषांतरातील ही त्रुटी निदर्शनास आणली असती तर… पण टोकाचा भाजपविरोध आणि टीकेची तीव्र इच्छा यामुळे त्यांनी यात थेट भाजपचाच दोष असल्याचे सांगून टाकले.
आता गुगल ट्रान्सलेट काय ते समजून घ्या?
हे संपूर्ण प्रकरण गुगल ट्रान्सलेटमुळे वादात रूपांतरित झाले आहे. भाजपाच्या अधिकृत वेबसाइटवर वाचकांना सर्व कंटेंट हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांत पाहण्याचा पर्याय आहे. एखाद्याला वेबसाइटचा कंटेंट हिंदीमध्ये पाहायचा असल्यास गुगल ट्रान्सलेटवरून ते भाषांतरित केले जाते.
आता या प्रकरणात गुगल ट्रान्सलेशनने रावेर या शब्दाचे चुकीचे भाषांतर केल्याचे दिसते. रावेर हे स्थळाचे नाव न समजता गुगलने हिंदी शब्द समजून त्याला ‘समलैंगिक’मध्ये रूपांतरित केले. यावरून गुगल ट्रान्सलेशनमुळे झालेल्या चुकीचे खापर भाजपवर फोडण्यात काहीही अर्थ नाही हे स्पष्ट होते.
इंटरनेटवर ट्रान्सलेशन कसे होते, याची कल्पना नसलेल्या स्वाती चतुर्वेदी यांनी भाजपावर आरोप केले. भारतीय नावे चुकीच्या पद्धतीने अनुवादित करणाऱ्या टेक दिग्गज गुगलविरुद्ध बोलण्याऐवजी त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांना यात ओढून एकप्रकारे त्यांचाही अनादर केला आहे.
गोंधळानंतर गुगलने सुधारली आपली चूक
गुगलच्या त्रुटीमुळे खडसे यांच्या मतदारसंघाचे नाव चुकीच्या पद्धतीने अनुवादित झाले.या सर्व प्रकारानंतर गुगलने तांत्रिक त्रुटी ओळखल्या आणि त्या सुधारल्या. गुगलने त्वरित हस्तक्षेप केल्याने आता भाजपच्या अधिकृत संकेतस्थळावर ‘रावेर’शब्दाचे अचूक हिंदी भाषांतर दिसत आहे.