मुंबई : – सध्याच्या परिस्थितीत भूजल टंचाई व पर्यायाने भूजलाचे महत्त्व वाढत असल्यामुळे भूजल व्यवस्थापनाविषयी अधिक जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
श्री. पाटील यांच्या हस्ते पुणे येथे भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या मुख्यालयातील (भूजल भवन येथील ) नूतनीकृत भूजल जागृती प्रदर्शनी कक्षाचे उद्घाटन झाले. भूजल जागृती प्रदर्शनी ही शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थी, नागरिक,जलसुरक्षक, ग्रामसेवक यासारख्या ग्रामीण स्तरावर कार्यरत शासकीय कर्मचारी आणि ग्रामपंचायत सदस्य, सरपंच यांच्यासाठी उद्बोधक ठरेल असा विश्वास पाणीपुरवठा मंत्री श्री.पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
पाणीपुरवठा व स्वच्छता विभागांतर्गत भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा कार्यरत आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा ही महाराष्ट्र राज्यातील भूजल संबंधित शिखर यंत्रणा आहे.भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणाद्वारे भूजलाचा अंदाज काढणे, संभाव्य टंचाईग्रस्त गावांचा अंदाज काढणे, ग्रामीण भागातील भूजल आधारित पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे शाश्वततेसाठी विविध स्त्रोत बळकटीकरणाच्या उपाययोजना राबविणे, समुदाय सहभागातून भूजल संपत्तीचे व्यवस्थापन आणि नियमन करणे, भूजल गुणवत्तेचे संनियंत्रण इत्यादी भूजल संबंधित अनेक महत्त्वाच्या योजना राबविण्यात येतात.
विद्यार्थी आणि शासकीय कर्मचाऱ्यांसाठी उपयुक्त
भूजल जागृती प्रदर्शनीमध्ये भूजलाची उपलब्धता व हालचाल, भूजल उपश्यांच्या विविध उपाययोजना, भूजल पुनर्भरणाच्या विविध उपाययोजना,भूस्तर व जलधारक संरचना इत्यादी दर्शविणारे विविध मॉडेल्स प्रदर्शित केलेले आहेत. हे प्रदर्शन भूजल विज्ञान आणि भूजल दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे असून विद्यार्थी आणि शासकीय कर्मचाऱ्यांनाही भूजलाचा अभ्यास करताना निश्चितच लाभ होणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव किशोर राजे निंबाळकर, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे संचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, केंद्रीय भूमिजल मंडळ नागपूर येथील विभागीय संचालक डॉ. पी.के. जैन तसेच युनिसेफचे युसुफ कबीर आदी मान्यवर उपस्थित होते.