नवी दिल्ली : महाराष्ट्रातील भंडारा जिल्हा रुग्णालयात शुक्रवारी रात्री उशिरा नवजात बालकांच्या दक्षता विभागाला लागलेल्या आगीत होरपळून १० बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलंय.
‘महाराष्ट्राच्या भंडाऱ्यात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली जिथे आपण अनमोल निरागस बालकांना गमावलं. शोकाकूळ संतप्त कुटुंबासोबत माझी सहानुभूती आहे. जखमी लवकरात लवकर बरे होतील अशी आशा करतो’ असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय.
Heart-wrenching tragedy in Bhandara, Maharashtra, where we have lost precious young lives. My thoughts are with all the bereaved families. I hope the injured recover as early as possible.
— Narendra Modi (@narendramodi) January 9, 2021
तर गृहमंत्री अमित शहा यांनीदेखील या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. “या घटनेबद्दल शब्दांत दु:ख व्यक्त करणे अशक्य आहे. बाळांच्या कुटुंबीयांबद्दल मी सहवेदना व्यक्त करतो. या दुखद संकटाच्या प्रसंगात देव त्यांना शक्ती देवो”, अमित शहा म्हणाले.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील आऊटबॉर्न युनिटमधून रात्री दोनच्या दरम्यान अचानक धूर निघत असल्याचं समोर आलं. ड्युटीवर असलेल्या नर्सने दार उघडून बघतला असता त्या रुममध्ये मोठ्या प्रमाणात धूर होता, त्यामुळे त्यांनी लगेच रुग्णालयातील अधिकाऱ्यांना सांगितले.