ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मुंबई लोकलसंदर्भात अत्यंत महत्त्वाची बातमी

मुंबई : मुंबईतील उपनगरीय लोकल ट्रेन सेवेच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. लवकरच मुंबई लोकल ठराविक वेळेत सर्वांसाठी सुरू होण्याची शक्यता आहे. चाकरमान्यांची प्रवासाची अडचण लक्षात घेऊन काही प्रमाणात दिलासा देण्याचा राज्य सरकारचा विचार सुरू आहे. त्यानुसार, कमी गर्दीच्या वेळेस म्हणजे, सकाळी ७ च्या आधी आणि रात्री १० नंतर लोकल ट्रेन सर्वांसाठी सुरू होण्याची शक्यता आहे.

मुंबईतील कोरोना स्थिती नियंत्रणात आली आहे. मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यास मुंबई महानगरपालिकेला यश आलं आहे. त्यानंतर राज्य सरकारच्या वतीनं रेल्वेला देण्यासाठी मुंबई लोकल संदर्भात हा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. तसेच मुंबई लोकल सुरु करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याचंही अनेक नेत्यांकडून सांगितलं जात होतं. परंतु, काल राज्यात ब्रिटनमधील नव्या कोरोना स्ट्रेनचे 8 रुग्ण सापडले आहेत. त्यातील 5 रुग्ण हे मुंबईतील आहेत. त्यामुळे आता राज्य सरकार मुंबई लोकलसंदर्भात काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. मुंबई लोकलसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.

सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसह राज्य सरकारनं वेळोवेळी परवानगी दिलेल्या कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवासाची मुभा आहे. महिलांनाही प्रवासाची मुभा असला तरी त्यासाठी ठराविक वेळा देण्यात आल्या आहेत. सध्या पश्चिम रेल्वे मार्गावर १३६७ तर, मध्य रेल्वे मार्गावर १७७४ फेऱ्या चालवल्या जात आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!