ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मुख्यमंत्री ठाकरेंची पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांना श्रद्धांजली

मुंबई :- कुस्ती ही लढवय्या महाराष्ट्राची शान आहे. मातीतल्या या खेळावर महाराष्ट्राचे नाव कोरले ते  पहिला हिंदकेसरी किताब पटकावून श्रीपती खंचनाळे यांनी. त्यांच्या निधनामुळे अनेक हिंदकेसरींचे आणि  होतकरू कुस्तीगीर पैलवानांचे वस्ताद  म्हणजे मार्गदर्शक छत्र हरपले आहे, अशी श्रद्धांजली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदकेसरी ज्येष्ठ कुस्तीपटू श्रीपती खंचनाळे यांना वाहिली आहे.

 

मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, कुस्ती ही महाराष्ट्राची शान आणि मान आहे. महाराष्ट्राने कुस्तीला लोकाश्रय आणि राजाश्रय दिला. या कुस्तीवर महाराष्ट्राचे नाव कोरण्याची किमया ज्येष्ठ कुस्तीपटू श्रीपती खंचनाळे यांनी केली. देशातला  पहिला हिंदकेसरी किताब पटकावून त्यांनी महाराष्ट्राचा आणि कुस्तीचा गौरव उंचावणारी कामगिरी केली. ते आयुष्यभर कुस्तीत येणाऱ्या अनेक पिढ्यांना मार्गदर्शन करत राहीले.

 

अनेक हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी यांच्यासह राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कुस्तीत नाव कमावलेल्या पैलवानांचे ते वस्ताद ठरले. काळानुसार या खेळातील बदलांकडेही त्यांनी सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले. त्यांना क्रिडाक्षेत्रातील अनेक पुरस्कार मिळाले. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील  क्रिडा क्षेत्रातील आणि विशेषतः कुस्तीच्या क्षेत्रातील मार्गदर्शक असे छत्र हरपले आहे. ज्येष्ठ कुस्तीपटू हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!