सोलापूर : 25 सशक्त भारताच्या निर्मितीसाठी युवकांनी योगदान देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी प्रत्येक युवकांनी मतदार यादीत नाव नोंदवावे आणि प्रत्येक निवडणुकीत मतदानाचा पवित्र हक्क बजावावा, असे आवाहन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी केले.
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त रंगभवन येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. जिल्हा निवडणूक कार्यालयामार्फत आयोजित या कार्यक्रमाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मोहन देशपांडे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव शशिकांत मोकाशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी भारत वाघमारे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. फडणवीस म्हणाल्या, ‘भारताला स्वातंत्र्य मिळून सुमारे सात दशके होऊन गेली. आपण या काळात अनेक क्षेत्रात आघाडी घेतली आहे. पण अद्यापही आपल्याला प्रगती करायची आहे. यासाठी तरुणांनी मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे’.
न्यायाधीश देशपांडे यांनी तरूणांनी मतदार म्हणून आवर्जून नोंदणी करावी. मतदानाचा हक्क न चुकता बजवावा. मतदार प्रतिज्ञेतील प्रत्येक शब्दांचे पालन करावे, असे आवाहन केले.
यावेळी उपजिल्हाधिकारी हेमंत निकम, दीपक शिंदे, सुप्रिया डांगे उपस्थित होते. तरुण मतदारांना ओळखपत्र आणि बॅजेसचे वाटप करण्यात आले. तहसीलदार जयवंत पाटील, अमोल कुंभार, रवींद्र चव्हाण, श्री. परदेशी यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
रमेश खाडे यांनी पोवाड्याद्वारे मतदार नोंदणी आणि मतदानाच्या हक्काचे महत्त्व सांगितले. संगमेश्वर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना आणि दयानंद महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या पथकांनी पथनाट्य सादर केले.सूत्रसंचालन श्री. माळवदकर तर आभार प्रदर्शन तहसीलदार अमोल कुंभार यांनी केले.