मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय स्तरावर विरोधी पक्षांशी मोट बांधली जावी, असा आग्रह काँग्रेसने धरला आहे. विशेष म्हणजे शरद पवारांना पंतप्रधानपदाचा उमेदवार करण्याची काँग्रेसची तयारी असून संयुक्त पुरोगामी आघाडीचे (यूपीए) अध्यक्षपद पवारांकडे देण्यात येईल, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होती.
मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने या सर्व बातम्या निराधार असल्याचं सांगत वृत्त फेटाळून लावलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तापसे यांनी प्रसारमाध्यमांनी निर्धास्तपणे शरद पवार युपीएचे नवे अध्यक्ष होणार असल्याचं वृत्त दिल्याचं म्हटलं आहे. “युपीएमध्ये अशा प्रस्तावासंबंधी कोणतीही चर्चा झालेली नाही हे राष्ट्रवादी काँग्रेस स्पष्ट करु इच्छित आहे,” असं महेश तपासे यांनी म्हटलं आहे.
“सध्या देशात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावरुन लक्ष हटवण्यासाठी काहीजणांनी हेतू परस्पर ही बातमी पेरली असल्याचं दिसत आहे,” अशी टीकाही यावेळी त्यांनी केली.