रक्तदात्यांचे शहर म्हणून सोलापूरची ओळख व्हावी : आ. सुभाष देशमुख,लोकमंगल फाऊंडेशनच्या रक्तदान शिबिरास प्रतिसाद
सोलापूर,दि.1 : रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. रक्तदानामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात. तरूणांनी रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा. सर्व लोकांनाही यासाठी प्रोत्साहित करावे. रक्तदात्यांचे शहर म्हणून सोलापूरची ओळख व्हावी, असे प्रतिपादन आ. सुभाष देशमुख यांनी केले.
-
1 ऑक्टोंबर रक्तदान दिनानिमित्त लोकमंगल फाऊंडेशनच्यावतीने विकास नगर येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले, त्यावेळी आ. देशमुख बोलत होते. या शिबिरास रक्तदात्यांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी 70 बाटल्या रक्त संकलन झाले. यावेळी उपमहापौर राजेश काळे, सभागृह नेते श्रीनिवास करली, युवा नेते मनिष देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.
आ. देशमुख म्हणाले की, रक्तदान जसे गरजू रुग्णाला जीवनदान देते, तसे ते रक्तदात्याचे आरोग्यही राखत असते. जाती धर्माच्या भिंती ओलांडून नकळत दुसर्याबरोबर जुळणारे हे नाते मनाला खूप सुखावते. आज रक्ताची गरज ही दिवसेंदिवस वाढतेच आहे. यासाठी अधिकाधिक निरोगी व्यक्तींनी रक्तदानासाठी पुढे येणे आवश्यक आहे. खास करून तरूणांनी यात पुढाकार घेतला पाहिजे. यावेळी श्रीनिवास पुरुड, बाळू गोणे, संतोष भोसले, महेश देवकर, प्रथमेश कोरे, डॉ. शिवराज सरतापे, अक्षय अंजीखाने, जिलानी सगरी, सिद्धलिंग मसुती आदी उपस्थित होते. याशिबिरासाठी सिव्हील हॉस्पिटलच्या स्टाफचे सहकार्य लाभले.