सोलापूर : ‘रस्ता सुरक्षा अभियान’ लोकअभियान बनायला हवे तरच रस्ता सुरक्षेबाबत जाणीव जागृती होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले.
जिल्हा रस्ता सुरक्षा समिती, परिवहन विभाग, शहर आणि ग्रामीण पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान आयोजित करण्यात आले होते. त्याच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी शंभरकर बोलत होते.
यावेळी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम, पोलीस उपायुक्त दीपाली घाटे-घाडगे, माजी नगरसेवक दिलीप कोल्हे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे, अर्चना गायकवाड आदी उपस्थित होते.
श्री . शंभरकर म्हणाले, “रस्ता सुरक्षेबाबत समाजात साक्षरता होण्याची आवश्यकता आहे, हे अभियान केवळ शासनाचे न राहता समाजातील प्रत्येक घटकांचे बनायला हवे.”
श्री. स्वामी यांनी रस्ता सुरक्षा अभियानाबाबत ग्रामीण भागातही जागृतीसाठी प्रयत्न केला जाईल, असे सांगितले.
श्रीमती सातपुते यांनी देशात दरवर्षी अपघातात दीड लाखाहून अधिक लोक मरण पावतात. यामध्ये मोठया प्रमाणात तरुणांची संख्या असते. तरुणांचा मृत्यू होणे देशासाठी नुकसानकारक आहे. त्यामुळे रस्ता सुरक्षा अभियानातील सूचनांचे प्रत्येकाने पालन करणे गरजेचे आहे.
यावेळी श्रीमती घाटे-घाडगे, श्री. कदम, सारंग तारे यांनी मनोगत व्यक्त केले. श्री. डोळे यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संभाजी धोत्रे, राज्य परिवहन महामंडळाचे नियंत्रक दत्तात्रय चिकोर्डे, महापालिकेचे उपायुक्त धनराज पांडे, परिवहन निरीक्षक सतीश जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त रुपाली दरेकर आदी उपस्थित होते.