ध्यास विश्वसार्ह बातमीचा

रस्त्यावर संघर्ष करावाच लागेल… वाढीव वीज बिलावरून मनसेचा ठाकरे सरकारला इशारा

मुंबई:  सर्वसामान्यांना आलेल्या अव्वाच्या सव्वा वीज बिलांचा प्रश्न राज्यात सध्या चांगलाच पेटला आहे. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील आक्रमक झाली असून वाढीव वीज बिलाचा सर्वसामान्यांना झटका देणाऱ्या राज्यातील ठाकरे सरकारविरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा मनसेनं दिला आहे.

करोनाकाळातील वाढीव वीज देयकांतून ग्राहकांना दिलासा देण्याच्या मुद्दय़ावर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी घूमजाव केले. वीज कंपन्या चुकीचे देयक देणार आणि सरकार त्याचे पैसे भरणार, हे कसे चालेल, असा सवाल करत उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्या अखत्यारीतील अर्थ विभागाने राऊत यांची सवलतीची मागणी फेटाळली. त्यामुळे वीज सवलत मिळण्याची शक्यता मावळल्याने ग्राहकांमध्ये संतापाची भावना आहे. दरम्यान, यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून ऊर्जामंत्र्यांवर टीकाही करण्यात आली होती. आता मात्र मनसेनं संघर्ष करावाच लागेल असं म्हणत इशारा दिला आहे.


मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी एक ट्वीट केलं आहे. ‘वीज बिलांच्या बाबतीत निवेदनं, अर्ज, बैठका, विनवण्या सगळं झालं. पण सरकार ढिम्म आहे. जनतेला दिलासा देण्यासाठी साहेबांच्या आदेशानंतर रस्त्यावर संघर्ष करावाच लागेल. कारण, ‘लाथो के भूत बातों से नही मानते,’ असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!